नागपूर : शिक्षण आणि नोकरीसाठी विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अजनी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस येत्या १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या गाडीचा उद्घाटन सोहोळा नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर सकाळी १० वाजता आयोजित केला जाणार आहे. ही गाडी नागपूरहून सोमवार आणि पुण्याहून मंगळवार वगळता आठवडाभर धावणार आहे.

या गाडीचा १२ तासांचा प्रवास असून ‘चेअरकार’ची सुविधा आहे. आठ तासांपेक्षा अधिक तासांचा प्रवास असल्याने या वंदे भारत एक्सप्रेसला शयनयान (स्लीपर) डबे असतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु दिवसभराचा प्रवास असल्याने स्लीपर ऐवजी ‘चेअरकार’ असलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे.

ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौड, अहिल्यानगर, कोपरगाव थांबणार आहे. या गाडीच्या उदघाटन सोहळ्याच्या तारखेबाबत अद्याप अधिसूचना निघायची आहे. गाडी सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी ती निघेल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले.

सध्या नागपूर ते पुणे अंतर कापण्यासाठी दुरान्तोला १२ तास ५५ मिनिटे वेळ लागतो. वंदे भारत एक्स्प्रेसला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे. यासोबत नागपूरमार्गे पुणे-रिवा साप्ताहिक गाडी सुरू झाली आहे. यापूर्वी गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूरमार्गे गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस आहे. दरम्यान, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर, पुणे आणि मुंबई दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत. दिवसभर प्रवास पुण्याहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटेल, अजनीला सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहचेल. तर अजनीहून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल, पुण्याला रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.