अमरावती : जिल्ह्यात नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पळवापळवीचे, फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे.
रविवारी दर्यापूरमध्ये उलथापालथ पहायला मिळाली. भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या प्रदीप मलिये यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत प्राप्त होताच त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यासंह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर काल चिखलदरा येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
धारणी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुनील चौथमल यांनी आपल्या २५ हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. दर्यापूरमध्ये भाजपतर्फे प्रदीप मलिये यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची आपण स्वत: भेट घेतली होती. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याची आपली इच्छा असल्याने त्यांना आपण सांगितले, पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे प्रदीप मलिये यांनी सांगितले. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड आणि इतर नेते उपस्थित होते.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे धारणी येथील नेते सुनील चौथमल यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुनील चौथमल यांच्या भाजप प्रवेशाला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
हा महत्वपूर्ण राजकीय निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे मुख्य निवडणूक प्रभारी संजय कुटे यांच्या मार्गदर्शनानुसार झाल्याचे त्यांनी सांगितले. धारणीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सुनील चौथमल यांचे भाजपमध्ये येणे हे धारणीच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल आहे. आगामी काळात सर्वांनी एकजुटीने काम करून धारणी आणि मेळघाटचा जास्तीत जास्त विकास करू, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून चौथमल यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये सौरभ चौथमल, ओम चौकसे, सुमित चौथमल आदींचा समावेश आहे. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे विनोद गुहे, भाजपच्या सुधा तिवारी, सचिन सोनोने आदी उपस्थित होते.
