वर्धा: महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या काळापासून वर्धा रेल स्थानक प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर दक्षिणमार्गे जाणाऱ्या गाड्यांना वर्धा पूर्व जे आता सेवाग्राम स्थानक म्हणून ओळखल्या जाते, थांबा सूरू झाला. मध्य रेल्वे वरील एक महत्वाचे जंक्शन असलेल्या वर्धेतून आता एक नवी गाडी सूरू होणार.ब्रम्हपुर(ओडिशा) ते उधना(सुरत) नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस वर्धा मुख्य रेल्वे स्थानकावरून धावणार असल्याचे घोषित झाले आहे.

भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओडिशा) आणि उधना (सुरत) यांना जोडणारी नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन २७ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्मपूरहून विशेष सेवा म्हणून होणार आहे. सेवाग्राम मार्गे धावणारी जोगबनी-इरोड अमृत भारत एक्सप्रेस ही आधीच आठवड्यातून दोन वेळा (गुरुवार/रविवार) उपलब्ध आहे.

वर्धा मुख्य रेल्वे स्थानक येथून धावणारी ही दुसऱ्या प्रकारची रेल्वे वर्धेकरांना उपलब्ध असेल, ज्यामुळे आरक्षित नसलेल्या प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होईल.उद्घाटन झाल्यानंतर या नियमित सेवेचे नाव ब्रह्मपूर-उधना-ब्रह्मपूर साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस असे आहे.ही गाडी दर रविवारी सकाळी ७:४० वाजता उधनाहून (सुरत) सुटेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन दर सोमवारी रात्री ११:४५ वाजता ब्रह्मपूरहून निघेल आणि बुधवारी सकाळी ०८:४५ वाजता उधना येथे पोहोचेल.

उधनाहून (सुरत) निघालेली ही ट्रेन दर रविवारी सायंकाळी ०५.४८ वाजता वर्धा जंक्शन येथे पोहोचेल, तर ब्रह्मपूरहून निघालेली रेल्वे दर मंगळवारी रात्री ०८.५८ वाजता वर्धा जंक्शन येथे पोहोचेल.या मार्गावर उधना (सुरत), बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धारगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांताबांजी, टिटलागढ, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, परवतीपुरम, बोबिली, विझियानगरम, श्रीकाकुलम, पलासा आणि ब्रह्मपूर असे थांबे देण्यात आले आहे.

या ट्रेनमध्ये २२ आधुनिक एलएचबी अमृत भारत कोच असतील, ज्यात ०८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, ०१ पॅन्ट्री कार आणि ०२ एसएलआर कोच यांचा समावेश आहे.

ही सेवा ओडिसा, छत्तीसगड, विदर्भ आणि गुजरात या प्रमुख प्रदेशाना जोडताना प्रवाशांना परवडणारा प्रवास उपलब्ध करून देईल. अशी माहिती मध्य रेल्वे झेडआरयूसीसी सदस्य प्रणव सुरेंद्र जोशी यांनी दिली. ते म्हणाले की , “ही नवीन अमृत भारत ट्रेन वर्धा आणि विदर्भातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे, जी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायक, वेळेची बचत करणारी व सर्वांना परवडणारी रेल्वे सेवा सुनिश्चित करते.” ही नवीन रेल्वे सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकजभाऊ भोयर तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री रामदासजी तडस यांचे प्रणव जोशी यांनी विशेष आभार व्यक्त केले.