अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहार जनशक्‍ती पक्षाचा उमेदवार उभा करू आणि हा उमेदवार १ लाख मतांच्‍या फरकाने निवडून येईल, असा दावा आमदार बच्‍चू कडू यांनी केल्‍याने महायुतीतील विसंवाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत होईल, असे सांगून तूर्तास आपण महायुतीतच असल्‍याचे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे असले, तरी ते महायुतीतून बाहेर पडण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीच्‍या जागेवर भाजपच लढेल, पक्षचिन्‍हावर निवडणूक लढवली जाईल, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. पण, जागावाटपाच्‍या चर्चेच्‍या वेळी आपल्‍याला विश्‍वासात घेतल्‍या गेले नाही, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा…मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्‍यू, २५ जण जखमी

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे दोन आमदार आहेत. जिल्‍ह्यात मोठी ताकद आहे. तरीही प्रहारचा विचारही केला जात नाही, ही प्रहारच्‍या कार्यकर्त्‍यांची नाराजी आहे. आमदार रवी राणांकडून धमक्‍या मिळत आहेत. महायुतीला आमची गरज नाही, असे दिसत आहे. त्‍यामुळे आम्‍ही अमरावतीतून लढत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. आम्‍हाला योग्‍य उमेदवार सापडलेला आहे. तो सक्षम आहे आणि १ लाख मतांच्‍या फरकाने तो निवडून येईल. उमेदवाराचे नाव येत्‍या ६ एप्रिलला जाहीर करण्‍यात येईल, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा…अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवारीचे त्रांगडे; देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले, तरीही…

अमरावतीतून अद्याप महायुतीच्‍या उमेदवाराचे नाव जाहीर करण्‍यात आलेले नाही. भाजपतर्फे खासदार नवनीत राणा या उमेदवार असू शकतात, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. त्‍या सध्‍या मेळघाटात प्रचारात व्‍यस्‍त आहेत. त्‍यांच्‍या उमेदवारीला बच्‍चू कडू यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्‍वभूमीवर बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने निवडणुकीच्‍या रिंगणात उडी घेतल्‍यास महायुतीच्‍या अडचणी वाढणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu possibility to leave mahayuti will announce candidate of prahar janshakti party for amravati lok sabha seat mma 73 psg