अमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया!’ म्हणताना या वर्षी एक ‘माणूसपणाची माळ’ आपल्या हृदयाला घालू या. शेतकऱ्यांच्या वेदनांचा जागर करू या. आपल्या सणातून एखाद्या घरात उजेड आणू या. हीच खरी समाजसेवा, हीच खऱ्या गणेशभक्तीची परिभाषा आहे. गणपतीच्या देखाव्यातून सरकारला प्रश्न विचारा. आज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा तुम्ही आवाज व्हा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातल्या गणेशभक्तांना केले आहे.

गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई नव्हे, तो शेतकऱ्याच्या डोळ्यातला अश्रू पुसणेही असावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, ती एका घराची, एका पिढीच्या भवितव्याची राख झालेली कहाणी आहे. महाराष्ट्रात सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नी, मुले आणि वृद्ध आईवडील यांच्यासाठी गणेश मंडळाचे देखावे व मंडळांच्या दानपेट्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी आशेचा दीप लावू शकतात. यंदाचे देखावे केवळ सजावटीसाठी नव्हे, तर सजगतेसाठी असतील, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांचा जीवनपट मांडणारे असावे, हे महाराष्ट्रातील गणेशमंडळांनी हे ठरवायला हवे, असे निवेदन बच्चू कडू यांनी केले आहे.

शेतीतून उदरनिर्वाह करणारा शेतकरी बाप कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे, मुला बाळांचे शिक्षण थांबले आहे, अशा काळात, गणेश मंडळांनी आपल्या देखाव्यांतून हाच प्रश्न सरकार समोर मांडावा. आणि शेतकऱ्याच्या लेकरांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी एक दानपेटी ठेवावी, हीच खरी गणेशभक्ती, असे भावनिक आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

शेतकरी आजही अंधारातच आहे. सरकारच्या हमीभावाच्या फसव्या घोषणांनी शेतकरी भरकटला आहे. पिकवलेला पिकातून त्याचा लागत खर्चही निघत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फक्त भाषणांपुरतीच उरलीत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, म्हणणारे आज मौन बाळगून आहेत. गणेश भक्तांनो आपण मौनात राहू नका. आपल्या सणातून समाजाला जागृत करा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

महाराष्ट्रभर गणेशभक्तांचा उत्साह, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि मंडपात रंगणारे देखावे, हे दृश्य दरवर्षीचेच. पण यावर्षीच्या पारंपरिक गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीचा नवा चेहरा द्या. शेतीचे आयुष्य हरवले आहे, पण आपल्या भक्तीतून एखादे आयुष्य वाचू शकते, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.