भंडारा : निवडणूक जवळ आली की, पक्षांतर्गत वाद आणि कलह चव्हाट्यावर येणे हे काही नवीन नाही. त्यातूनच अनेकदा पक्ष बदल किंवा राजीनामा नाट्य सुरू होते. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तुमसर मध्ये भाजपच्या नेत्यांची नाराजी आता उघडपणे दिसू लागली आहे.
भाजप नेत्या कल्याणी भुरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि माजी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांनीही त्यांच्या संघटनात्मक पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर नगरपालिका निवडणूक ही लढविणार नाही असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
“संघटनेत काम करताना कधी जातीचे राजकारण मी केले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. पण आज जातीयवाद करीत असल्याचा आरोप पक्षातीलच काही लोक करीत आहे. यामुळे मी व्यथित झालो आहे. अनेक प्रकारचे आरोप माझ्यावर केले आहेत. त्यामुळे आता केवळ पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा मी जिल्हाध्यक्षांकडे पाठवला असून यापुढे पक्षाचे कोणतेही पद आणि जबाबदारी मी स्वीकारणार नाही. आगामी नगरपालिका अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढवणार नाही, असे पडोळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तुमसर मध्ये भाजप च्या गोठ्यात अनेक हादरे बसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजप नेत्या कल्याणी भुरे यांनी भाजपमध्ये महिलांना योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप करत पक्षातून बाहेर पडल्या. त्यानंतर आता भाजपचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी त्यांच्या संघटनात्मक पदाचा राजीवनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नवनवीन राजकीय घटना पुढे येत आहेत.
आज भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि तुमसर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यापुढे आपण पक्षाचा प्राथमिक सदस्य या नात्याने सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि अन्य जबाबदाऱ्या पार पाडताना कधीही जातीय राजकारण केले नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन संघटन वाढीसाठी आजपर्यंत प्रयत्न करीत आलो. मात्र आज माझ्यावर जातीयवादाचा आरोप होत आहे असे ते म्हणाले.
जातीजातीत फूट पाडण्याचा प्रयत्न मी करतो, अशी वक्तव्य पक्षाच्याच काही लोकांकडून होत आहेत. आजपर्यंत निष्ठेने काम केल्याने ही गोष्ट मला प्रचंड वेदना देणारी आहे. पक्षकार्यात जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोपही माझ्यावर केला जात आहे. एकूणच माझ्याबद्दल सुरू असलेले आरोप आणि चर्चा खेदजनक आहेत. मात्र यात कुठेही पक्षाचे नुकसान होऊ नये पक्षाच्या प्रदीप पडोळे यांनी स्पष्ट केले.
सध्या त्यांच्याकडे जिल्हा कार्यकारणीतील अनेक पदांसह भाजपा राज्य परिषद सदस्य ही जबाबदारीही होती. सुरू असलेल्या चर्चा आणि लावल्या जात असलेल्या आरोपांच्या संदर्भात स्वतःची बाजू मांडताना पडोळे यांना रडू कोसळले. कार्याची अशी पावती मिळेल, असा विचार कधीही केला नव्हता असेही ते म्हणाले.
