नागपूर : नाग नदीचा समावेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या देशातील २७१ प्रदूषित नद्यांच्या यादीत झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधत नाग नदीच्या वास्तविक स्थितीबाबत गंभीर भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाग नदीच्या विविध ठिकाणांहून गोळा केलेले दूषित पाण्याचे नऊ सीलबंद नमुने केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांना सिव्हिल लाईन्स येथील सचिवालयात सुपूर्द केले.

या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नावे निवेदन देण्यात आले. काँग्रेसने आरोप केला की नाग नदीची सध्याची दयनीय अवस्था असूनही ती प्रदूषित नद्यांच्या यादीत समाविष्ट न होणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार नदीत सांडपाण्याचा अनियंत्रित ओघ, कचरा व दुर्गंधीमुळे पाणी अत्यंत विषारी झाले आहे. तरीही या नदीला “स्वच्छ” म्हणून दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना केतन ठाकरे म्हणाले, “नाग नदीला स्वच्छ दाखविण्याचा केवळ दिखावा केला जात आहे. वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे भिन्न आहे. नागपूरकरांना रोज दुर्गंधी व प्रदूषणाचा सामना करावा लागतो. १,९२७ कोटी रुपयांचा नाग नदी शुद्धीकरण प्रकल्प जाहीर होऊन तीन वर्षे उलटली, तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.” त्यांनी सांगितले की, चर्चा आणि घोषणा पुरेशा झाल्या असून आता प्रत्यक्ष कृती हवी.

ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या “नाग नदीत नौका विहार” या स्वप्नप्रकल्पावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण खात्याने कात्री लावली का?” असा सवाल त्यांनी केला. नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने तातडीने कृती आराखडा तयार करून सार्वजनिकरीत्या जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पाठवलेल्या पत्रात ठाकरे यांनी नाग नदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून निश्चित वेळापत्रकात पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे. “हा राजकीय प्रश्न नसून नागपूरकरांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. नाग नदी स्वच्छ होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहील,” असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात विवेक निकोसे, देवेंद्र रोटेले, सुभाष मानमोडे, अभिजीत झा, अभिषेक उसरे, सरस्वती सलामे, मनोज गावंडे, मोनिष चांदेकर, सत्यम सोडगीर, दीपक तभाने, अजय साखळे, रोहित यादव आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.