नागपूर – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. राहुल गांधी यांच्या ट्विटला पाठिंबा दर्शवताना सपकाळ म्हणाले की, “फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यात महिलांवरील अत्याचार, कोयता गँग, खोक्या संस्कृती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, कारण सध्या फडणवीस गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायचा आणि देशाचे पंतप्रधान कसं होतं होईल हा खटाटोप करीत आहेत. सपकाळ यांनी स्वारगेट प्रकरणाचा उल्लेख करताना सांगितले की, “महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे विधान लाजिरवाणे आहे. ही फक्त राजकीय बाब नाही, तर महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे,” असे त्यांनी म्हटले.

निवडणूक आयोगावरही सपकाळ यांनी निशाणा साधला. “राहुल गांधी यांनी मतचोरीच्या विरोधात देशभरात मोहिम सुरू केली आहे. ‘गली गली में चोर है, चुनाव आयोग चोर है’ ही जनतेची भावना आहे. मतदारसंघांतील गैरव्यवहार उघड होत आहेत आणि याला राहुल गांधींनी दिशा दिली आहे,” असे ते म्हणाले.

जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाईची मागणी करत सपकाळ म्हणाले, “साडेतीन एकर जमीन गिळंकृत करणाऱ्या मोहोळ यांचा राजीनामा झाला पाहिजे. व्यवहार रद्द करून चालणार नाही, दोषींवर कारवाई आवश्यक आहे.” भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे. कोणीही तिथे गेला की स्वच्छ होतो. सत्तेत आल्यानंतर सर्वांनाच क्लिन चिट दिली जाते.”

शेतकरी आणि मदत निधीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, “हे सरकार दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. पंतप्रधान आवास योजना, लाडकी बहिण योजना अडकल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत कोणतीही मर्यादा न ठेवता जाहीर करावी आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी.”

शेवटी, बाबासाहेब पाटील यांच्या शिक्षक कर्जावरील वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सत्ताधाऱ्यांना सवय झाली आहे आपल्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्याची,” असे ते म्हणाले. राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा देत सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “ही केवळ राजकीय टीका नाही; हा लढा महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा आहे.”