नागपूर : पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे अदानी आणि अंबानी या दोन उद्योजकांच्या सेवेत दिसतात, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केली. परवाना भवन ऑडिटोरियममध्ये शनिवारी ज्येष्ठ कामगार नेते मोहनदास नायडू यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कांगो बोलत होते. याप्रसंगी मंचावर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मोहन शर्मा, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे उपस्थित होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांगो पुढे म्हणाले, देश कठीण स्थितीतून जात आहे. मोदी सरकारने प्रथम नोटबंदीचा निर्णय घेतला. यावेळी सर्वसामान्य मजूर- नागरिक ५०० रुपयांची एक नोट बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत लागले होते. यावेळी १५३ लोकांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्याबद्दल एक शब्दही पंतप्रधानांनी काढला नाही. आता अदानी- अंबानी या उद्योगपतींनी प्रचंड कमाई केली. ते जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत आले. या दोघांची प्रगती बघता मोदी फक्त या दोघांच्या सेवेसाठी काम करत असल्याचे दिसते.

हेही वाचा…महायुतीतील ८० टक्के जागांचा तिढा सुटला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मोहनदास नायडू यांनी कष्टकरी, सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर आंदोलन व संघर्ष केला. त्यांच्या कामाची दखल घेत देशाला वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे व इंडिया आघाडीसाठी काम करावे, असेही कान्गो म्हणाले. विलास मुत्तेमावर म्हणाले, देशात संविधानिक संस्थांचा दुरूपयोग होत आहे. देशाला हुकुमशाहीकडे जाऊ द्यायचे नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन मोहनदास नायडू यांच्या धोरणाप्रमाने इंडिया आघाडीला मजबूत करावे. सतीश चतुर्वेदी म्हणाले, मोहनदास नायडू यांनी आम्हाला विद्यार्थी दशेत आंदोलनातून घडवले. नितीन राऊत म्हणाले, नायडू यांनी विचारधारेसाठी संघर्ष कसा करावा, याचा आदर्श शिकवला. संचालन अरुण वणकर यांनी केले.

हेही वाचा…पुन्हा एकदा…आमदार संजय गायकवाड! आता यामुळे सोशल मीडियावर धूम…

देशाच्या नेतृत्वाने अविचार केला तर देशातील सामाजिक शांतता नष्ट होऊन दंगली घडतील. त्याचा सर्वाधिक फटका खालच्या वर्गाला बसेल. स्वातंत्रापूर्वी इंग्रजांच्या हाती बंदूक होती. परंतु, आमच्या हाती काहीच नव्हते.तरीही आम्ही शांतीच्या मार्गाने लोकांना एकत्र करून स्वातंत्र मिळवले. आता देशाचे नेतृत्व चुकीच्या दिशेने नेत आहे. त्यामुळे सर्वांनी संविधान हा धर्मग्रंथ मानून स्थित्यंतर घडवण्याची गरज आहे, असे मत लिलाताई चितळे यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur cpi national secretary bhalchandra kango criticizes pm modi accuses him of serving adani and ambani mnb 82 psg