नागपूर : नागपूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. आरक्षणानुसार प्रभागांचे आराखडे निश्चित झाल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या गटांत हालचाली वाढल्या आहेत.

भाजपमध्ये माजी नगरसेवक आणि नवीन इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सल्ल्यानेच अंतिम उमेदवार ठरणार असल्याची जाणीव असल्याने इच्छुकांनी नियोजनबद्ध पद्धतीने गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

आरक्षण सोडतीमुळे काही माजी नगरसेवकांची जागा आरक्षित झाल्याने त्यांना घरी बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याउलट, २०१७ मध्ये आरक्षणामुळे बाजूला राहिलेल्या काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या अनुभवी मंडळींनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेसमध्ये रस्सीखेच

काँग्रेस पक्षालाही या निवडणुकीत नवचैतन्य आणण्याची संधी वाटते आहे. सलग तीन वेळा महापालिकेची सत्ता गमावल्यानंतरही इच्छुकांची रीघ काँग्रेसमध्ये लागल्याचे चित्र आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रभागाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या निवासस्थानी इच्छुकांची रीघ लागल्याचे दिसून येत आहे. तर माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, काँग्रेस नेते गिरीश पांडव आणि प्रफुल्ल गुडधे यांच्या संपर्क कार्यालयाकडे इच्छुकांची धाव घेतली आहे. काहींनी प्रत्यक्ष भेटीगाठी तर काहींनी अप्रत्यक्ष माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

युती-आघाडीबाबत अद्याप अस्पष्टता

महायुती आणि महाआघाडीचे युतीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याने शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट व अजित पवार गट) इच्छुकांनीही आपापल्या नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. कोणत्या पक्षात कोणाला जागा मिळेल हे ठरवण्यासाठी आतापासूनच रणनीती आखली जात आहे.

महापालिका निवडणुकीत आरक्षणाचा परिणाम प्रत्येक पक्षाच्या गणितावर झाला आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित होईपर्यंत शहरातील सर्व पक्षांमध्ये हालचाली वाढत असून नागपूरच्या राजकारणात चुरस आणि उत्सुकता दोन्ही वाढल्या आहेत.

पक्षीय बलाबल (२०१७)

एकूण नगरसेवक : १५१

  • भाजप : १०८
  • काँग्रेस : २९
  • बसप :१०
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
  • शिवसेना : ०२
  • अपक्ष : ०१