नागपूर : मध्य रेल्वेने महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत ३२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे. त्यातून दररोज एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्यावर प्रक्रिया केली जात असून त्यांच्या पुनर्वापरामुळे रेल्वेच्या गोड्या पाण्याच्या वापरात मोठी बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. मध्य रेल्वेस्थानक परिसर, रेल्वे वसाहत, कार्यालये, कार्यशाळा, कोच फॅक्टरीस, रुग्णालय आणि अन्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जात आहेत. मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. यामध्ये दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. त्यामुळे गोड्या पाण्याची बचत होत असून वाढत्या जलसंकटावर थोड्या प्रमाणात उपाय म्हणून त्याकडे बघितले जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर स्वच्छतेसाठी वापरले जाते. मालवाहक (ट्रॅक) धुणे, स्थानकाचे मजले पुसणे इत्यादी कामाकरिता वापरले जाते. गोडेपाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते.

हेही वाचा : एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत दोन लाखांचा दंड

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये १५७५ किलोलिटर प्रतिदिन जलशुद्धीकरणच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० किलोलीटर प्रतिदिन (केएलडी) क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट, अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नाशिक येथे २०० केएलडी क्षमतेचा एसटीपी, अकोला एसटीपी ५०० केएलडी क्षमता, खांडवा एसटीपी ५०० केएलडी क्षमता, कोपरगाव एसटीपी १५ केएलडी क्षमता, सोलापूर एसटीपी १५ केएलडी क्षमता, ४० केएलडी क्षमतेचा अजनी, नागपूर एसटीपी, १५ केएलडी क्षमतेचा शिर्डी एसटीपीचा समावेश आहे.

हेही वाचा : बुलढाणा : गणेश विसर्जनावर पावसाचे सावट! हवामान खात्याचा ३० पर्यंत पावसाचा अंदाज

‘मध्य रेल्वेच्या पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के बचत झाली आहे. संपूर्ण झोनमधील प्रमुख केंद्रांवर जल लेखापरीक्षण आणि बचत प्रक्षेपणांद्वारे जलसंपत्तीचे संरक्षण करण्यात पुढे आहोत’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur how central railways uses sewage water in maharashtra after treatment on it rbt 74 css