नागपूर: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १ ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले.
सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नाने लोकचळवळीचे स्वरूप आले, असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले. ते म्हणाले, लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत.
विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची २०२५ च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतु:सूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले की, सार्वजनिक-खासगी भागीदाराच्या प्रारूपाद्वारे गडकरी यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची विक्रमी वेळेत उभारणी केली. राजकारण हे सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन आहे, ही गडकरी यांची भूमिका महत्त्वाची आहे.
देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. ‘अमेरिकेतील चांगल्या रस्त्यांचे कारण तेथील श्रीमंती नाही. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे,’ हे अर्थपूर्ण उदाहरण गडकरी यांच्याकडून कायम दिले जाते. त्यांचा दृष्टिकोन रस्ते सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारा आहे. पारदर्शी कारभार, जलद निर्णय प्रक्रिया, निर्णयाची कुशलतेने अंमलबजावणी ही गडकरींची वैशिष्ट्ये होत.