नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्याशी निगडीत प्रमुख संघटना व भारतीय जनता पक्ष यांच्या समन्वय समितीची रविवारी नागपुरात रेशीमबागमध्ये बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत राज्यातील इतरही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असून पुढील वर्षात काय करायचे याबाबतही मंथन केले जाणार अससल्याची माहिती आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्यांच्या ३२ संघटनांसोबत भाजपची दरवर्षी बैठक होते. संघ आणि भाजप यांच्यात समन्वय ठेवण्याचा या बैठकीचा उद्देश असतो. संघाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमावर सरकारच्यावतीने केलेली अंमलबजावणी तसेच पुढील वर्षी राबवायचे उपक्रम या मुद्यांवर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा केली जाते. संघाकडून काही सूचनाही सरकारला केल्या जातात त्याच प्रमाणे काही मुद्यांवर सरकारचे कानही टोचले जातात. अशाच प्रकारची बैठक रविवारी नागपूरमधील रेशीमबागमधील हेडगेवार स्मृती भवनात होणार असून बैठकीला भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
चार महिन्याने महापालिकेच्या निवडणुका आहेत, नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संघाच्या संघटना भाजपसाठी निवडणूक प्रचारात उतरल्या होत्या. पुढच्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला संघाची मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची समजली जाते.
काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांववर केलेला हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर याचे संघाने समर्थन केले आहे. सिंदूर यात्रा काढून भाजप लोकांपर्यत भारतीय सैनिकांचा पराक्रम पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यामुळे ऐरणवर आलेला शेतकऱ्यांचा प्रश्न यावरही संघ भाजप समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामकाजा प्रचार करण्यासाठी भाजपने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्याबाबतही संघ दिशानिर्देश देऊ शकते. त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जाते.