बुलढाणा: हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जितका उपयुक्त तितकाच वेळोवेळी वादाचा विषय ठरला आहे. २०१७ -१८ मध्ये जवळपास तयार झाल्यावर दस्तूर खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१९ अखेरीस महामार्गचे लोकार्पण झाले. तेंव्हापासून होणारे लहान मोठे अपघात, चिंतेचा विषय ठरला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजिक झालेल्या व २५ प्रवाश्यांचे बळी घेणाऱ्या भीषण अपघाताने तो चिंतनाचा विषय ठरला. आजवर लाखो प्रवाश्यानी प्रवास केला तर दुसरीकडे अपराध जगताची एंट्री देखील झाली. यामुळे हा मार्ग एकाचवेळी उपयुक्त व वादाचा विषय ठरला. यात आता भर पडली ती कमी अधिक सात वर्षांपासून कागदोपत्री रखडलेल्या स्मार्ट सिटी ( नवनगरे वा कृषी समृद्धी केंद्रा) ची! समृद्धी वर १६ ठिकाणी ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.
त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन प्रस्तावित नवनगरांचा समावेश आहे. मात्र कमिअधिक सात वर्षांपासून ही नवनगरे कागदोपत्रीच अस्तित्वात आहे! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिला. त्यांनी सतत पाठपुरावा करून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमाने आणि अनंत अडचणीवर मात करीत मुंबई व नागपूर दरम्यानचा हा मार्ग साकारला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
असे असतानाही स्मार्ट सिटी वर्षानुवर्षे रखडने आश्चर्ययाची बाब ठरली.निधीची वानवा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, राज्यातील विचित्र राजकीय चित्र वा अज्ञात कारणामुळे म्हणा ही योजना बासनात पडली आहे.
शेतकरी तयार पण…
बुलढाणा जिल्ह्यातील २ नवनगरांचे असेच चित्र आहे. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यातून समृद्धी जातो. यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ आणि मेहकर तालुक्यातील साबरा काबरा या ठिकाणी स्मार्ट सिटीचे नियोजन आहे. सावरगाव माळ साठी सावरगाव, निमखेड, गोळेगाव, या गावातील मिळून २४४२ शेतकऱ्यांची १९४५ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. या जमिनीचे ८५ टक्के मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
साबरा साठी भूमरा, साबरा काबरा,फैजलापूर,गवंढाळा गावातील मिळून १६२० शेतकऱ्यांची १३८२ हेक्टर जमीनीचे संपादन करावे लागणार आहे. याच्या मूल्यांकनचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. जमिनीचे मोजमाप, मूल्यांकन झाले असून शेतकरी देखील जमीन विक्रीसाठी तयार आहेत. त्यांनी आपली संमती अर्ज देखील सादर केल्याने संपादन ची कोणतीच अडचण नाही की शक्तिपीठ प्रमाणे कुणाचा विरोध नाही. लँड पुलिंग स्कीम अर्थात थेट भागीदारी पद्धतीने संपादन करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शेत जमिनीच्या प्रकारनुसार मोबदला मिळणार आहे.
जिल्हा प्रसाशन सज्ज असून वरचेवर यावर बैठका सुरु आहे.
मात्र स्मार्ट सिटीचा कागदावरच खेळ सुरु आहे. राज्यात व केंद्रात भाजप आघाडीची बहुमतातील सरकारे आहे. मग ही दिरंगाई का? रस्ते विकास महामंडळचे दुर्लक्ष का?? असे प्रश्न एरणीवर आले आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अर्थमंत्री अजित पवार विकासासाठी आग्रही, त्यांचेच सहकारी मकरंद पाटील बुलढाण्याचे पालकमंत्री, सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार मनोज कायंदे अजितदादा गटाचे असे सर्व काही जुळून आलेला असताना स्मार्ट सिटी चा योग, या अविकसित भागात त्या माध्यमातून येणाऱ्या ‘समृद्धी’ चा योग जुळून का येत नाही? हा यक्ष प्रश्न आहे. याचे उत्तर एमएसआरडीसी कधी देणार हे त्यांनाच ठाऊक…
स्मार्ट दृष्टीक्षेप
इंटरेचेंज जवळच्या या नवनगरे मध्ये उद्योग व रहिवासी वसाहती राहणार असून कृषिवर आधारित उद्योगना प्राधान्य राहणार आहे. तिथे आधुनिक सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामध्ये गॅस पाईप लाईन, सोलर एनर्जी प्रकल्प, फायबर ऑप्टिकल्स, चा समावेश आहे. यामुळे या भागातच रोजगार उपलब्ध होणार आहे. पेट्रोल पंप, शाळा, कॉलेज यांचे ही प्रावधान आहे.