वर्धा – गत दोन वर्षात ओबीसी व मराठा हे दोन शब्द राज्याच्या राजकारणात टोकावर आहेत. आमचे कोण, त्यांचे कोण हे ठरवित असतांना राजकीय नेते पण संकटात सापडल्याचे चित्र दिसून आले. त्यात काही नावे संशयाच्या घेऱ्यात पण अडकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले म्हणून युती विरोधातील नेत्यांनी अश्या संशयग्रस्त नेत्यांवर टीका पण केली. आता यापुढे अश्यांना बाजूला सारा, असे संदेश गेले. आज त्याचे उघड दर्शन झाले आहे.

ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी सर्व संघटना या बॅनरखाली एका सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. नागपूर येथे १० ऑक्टोबरला ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात आज दुपारी इव्हेन्ट सभागृहात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य वक्ते म्हणून विजय वडेट्टीवार, खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी व सुधाकर अडबाले यांची नावे आहेत.

तसेच विविध पक्षातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे नमूद आहे. पण ओबीसी चेहरा म्हणून परिचित झालेले प्राचार्य बबन तायवाडे यांचा नामोल्लेख नाही. याची चर्चा ओबीसी संघटना वर्तुळात झाली. पण उघड कारण कोणी दिले नाही.

मात्र कराळे मास्तर म्हणून परिचित प्रा. नीतेश कराळे यांनी खरे कारण देत प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात की दोन दिवसापूर्वीच वडेट्टीवार साहेबांशी मी बोलून आलो. ते ईथे वर्धेतील सभेत हजर राहणार. प्राचार्य तायवाडे यांना बोलावलेच नाही. मंग ते येणारच कसे ? असा सवाल उपस्थित करीत कराळे म्हणतात की त्यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली. शासनाने मराठा आरक्षणाचा जिआर काढला, त्यावर ते चकार शब्द बोलले नाही. त्यांनी गोव्यात ओबीसी अधिवेशन घेतले. तिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप केला. काऊन तुम्हाले दुसरा माणूस भेटला नाही कां. ज्यायने ओबीसीत भांडणे लावली तोच भेटला कां ? जो सेक्युलर विचारसरणीचा असा नेता कां बोलावला नाही. त्यांच्या मागणीवर एकही जीआर निघाला नाही. त्यांनी ओबीसीचे आंदोलन केले. बारा, तेरा मुद्दे मान्य झाले, असे सांगितले. मात्र एकही मान्य झाला नाही. ही तायवाडे यांनी ओबीसी समाजाची केलेली दिशाभूलच होय. हे असं त्यांचं वागणं. म्हणून त्यांना आजच्या सभेत बोलावलेच नाही, असं खुलासा कराळे मास्तर यांनी केला आहे.