बुलढाणा: पुनर्वसन व अन्य पूरक मागण्याकडे जिगाव प्रकल्प व्यवस्थापन आणि यंत्रणाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आणि आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पानजिक पूर्णा नदीवर अडोल खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी एका संतप्त युवकाने पूर्णा नदीत उडी घेतली. दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या जोरदार जलप्रवाहात तो वाहून गेला. यावेळी उपस्थित पोलीस व अन्य कोणीही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. काल रात्री उशिरापर्यंत त्याचा आपत्ती बचाव व शोध पथकाने गावाकऱ्यांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा शोध लागला नाही.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना शुक्रवारी दुपारी हा थरारक आणि तितकाच दुर्देवी घटनाक्रम घडला. दरम्यान आज शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दोन पथकांकडून बेपत्ता आंदोलकाचा युद्धपातळीवर शोध घेण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र आज सकाळी १० वाजेपर्यंत त्याचा काही थांगपत्ता लागला नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आणि वरील भागात पूर्णेला पूर आल्याने शोध घेण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

जिगाव प्रकल्पा जवळील पूर्णा नदीकाठावर हे आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळे आंदोलने करण्यात आले. यामध्ये नांदुरा तालुक्यात असलेल्या जिगाव प्रकल्पाजवळ पूर्णा नदी काठावर आडोळ खुर्द येथील नागरिकांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. आडोळ खुर्द या गावाचा जिगाव प्रकल्पात पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश होता, मात्र अजूनही त्यांना जागा आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात येत होतं. हे प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करत असतानाच विनोद पवार (वय ४५ वर्षे, रा. गौल खेड )याने पूर्णा नदी पात्रात उडी घेतली. पूर्णा दुथडी भरून वाहत असल्याने आणि वेगवान जलप्रवाहमुळे आंदोलक वाहून गेला. या घटनेने उपस्थित पोलीस, यंत्रणा आणि गावाकऱ्यात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन देखील हादरले.

बुलढाणा येथून जिल्हा शोध बचाव पथकाला अडोल खुर्द कडे रवाना करण्यात आले. दुपारपासून रात्री उशिरा पर्यंत बेपत्ता इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री अंधारा मुळे शोध मोहिम थांबविण्यात आली. आज शनिवारी सकाळ पासून दोन पथकाकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत शोध लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान जिगाव प्रकल्प व्यवस्थापन, संबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचा आरोप गावकऱ्यातून होत आहे. दुसरीकडे आंदोलन निमित्त पोलीस बंदोबस्त असताना पवार याने (नजर चुकवून) नदीत उडी घेतल्याने हे प्रकरण अप्रत्यक्षरित्या का होईना पोलिसांवर शेकण्याची चर्चा आहे. पोलीस व अन्य गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत आंदोलनकर वाहून गेला. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिगाव प्रकल्प व्यवस्थापन, अन्य यंत्रणा हादरल्या आहे.