जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये नगराध्यक्षपदावर सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर, सोमवारी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपने जाहीर सभा घेऊन तसेच फेरी काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
चाळीसगावमध्ये शहर विकास आघाडीने नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या पदांसाठी तुल्यबळ उमेदवार देऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असताना, त्या जागी आपल्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपासून हालचाली वाढवल्या होत्या. प्रतिभा चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, माझ्या घरातील कोणताच सदस्य सार्वजनिक निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.
प्रत्यक्षात, प्रतिभा चव्हाण यांच्या समवेत जवळपास ३६ जणांनी नगरसेवकपदासाठी सोमवारी मोठ्या जल्लोषात अर्ज दाखल केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मैदानात आयोजित सभेच्या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी, शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार गटाचे माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग चाळीसगावमध्ये अजुनही आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीने राजीव देशमुख यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यानुसार, पद्मजा देशमुख यांनी शनिवारी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले आणि सहाय्यक निवडणूक सौरभ जोशी यांच्याकडे सादर केला आहे.
विशेष म्हणजे अभिषेक देशमुख यांनीही नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांच्याकडे यांनी शहर विकास आघाडीची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे चाळीसगावमधील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यातच आता चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चव्हाण-पाटील यांच्यात पुन्हा जुगलबंदी ?
दरम्यान, चाळीसगावमध्ये शहर विकास आघाडीचे नेतृत्व शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील हे करत आहेत. आणि प्रतिस्पर्धी भाजप आघाडीचे नेतृत्व आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आहे. साहजिक लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे आमदार चव्हाण आणि माजी खासदार पाटील यांच्यात आता पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
