धुळे : इकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद माजी खासदार बापू चौरे यांच्या कुटुंबाकडे आले आणि तिकडे काँग्रेसचे चौरे यांचे पुतणे आणि सुन काही कार्यकर्त्यांसह काँग्रेसमधून बाहेर पडले.या सर्वांनी काँग्रेसच्या सर्वात मोठ्या विरोधी पक्ष भाजपात प्रवेश करून राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली. ही घटना निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरली असताना काँग्रेसकडून मात्र यावर लगोलग कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.यामुळे लोकांमध्ये एकूणच चौरे कुटुंबाच्या संभाव्य निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या प्रवेशाला जवळपास आठवडा उलट्यावर मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले प्रवीण चौरे यांनी एकाच वाक्यात लोकांमधला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांचे चुलत बंधू तथा सामाजिक कार्यकर्ते आणि आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.जितेश चौरे व त्यांच्या पत्नी सौ.योगिता चौरे यांनी पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळे येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर प्रवीण चौरे यांची संभाव्य भूमिका काय असेल याबद्दल साऱ्यांना उत्सुकता होती. या अनुषंगाने ’ते भाजपात गेले त्यांना जाऊद्या,मी माझ्या वहिणींना त्यांच्यासमोर उभे करून लोकांचा संभ्रम दूर करीन’ अशा शब्दात प्रवीण चौरे यांनी उलटसुलट चर्चेवर पडदा टाकला.भारतीय जनता पक्षात चौरे भाऊबंदांनी प्रवेश केल्याने पिंपळनेरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असताना काँग्रेसने उशिरा आपली भूमिका स्पष्ट केली.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे म्हणाले, पिंपळनेर येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार असली तरी आमच्या वहिनी प्रतिभा प्रकाश चौरे यांना आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून विरोधी पक्षासमोर उभे करणार आहोत. यामुळे लोकांमधील संभ्रम दूर होईल आणि काँग्रेस पुन्हा एकदा जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करेल. येणाऱ्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ’धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा थेट सामना होणार आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या विश्वासावर उभा राहिला आहे. आमचा लढा पैशाच्या बळावर नव्हे, तर जनतेच्या पाठिंब्यावर आधारित असेल. स्थानिक समस्या, जनजीवनाशी निगडित प्रश्न आणि प्रशासनातील भ्रष्टाचार याच मुद्द्यांवर काँग्रेस आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहे.
धुळे जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. सत्तेचा दुरुपयोग, अपारदर्शक विकास आणि राजकीय स्वार्थाच्या खेळांविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू. काँग्रेस पक्षान पुढे होणाऱ्या नगरपालिका आणि पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल, असे चौरे यांनी सांगितले. आम्ही आघाडीच्या चर्चेला सुरुवात केली आहे आणि स्थानिक स्तरावर सहकार्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत असे ते म्हणाले.
पहिल्यांदाच होणाऱ्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत स्थानिक समस्या, पिंपळनेर-सटाणा रस्त्याची दुरवस्था, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या, वाहतूक कोंडी आणि शहरातील मूलभूत नागरी सोयीसुविधांचा अभाव हे प्रश्न केंद्रस्थानी असतील. काँग्रेसने या सर्व समस्यांवर ठोस भूमिका घेत जनतेसमोर विश्वासार्ह पर्याय देण्याचा निर्धार केला आहे. पिंपळनेर नगर परिषदेचा पहिला नगराध्यक्ष काँग्रेसचाच असेल. स्थानिक कार्यकर्त्यांचा, युवकांचा आणि महिलांचा जोश पाहता आम्हाला खात्री आहे की जनता विकासावर मतदान करेल. पक्ष लवकरच दमदार उमेदवारांची घोषणा करणार असून स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धुळे जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय परंपरा मजबूत आहे. माजी खासदार बापू चौरे यांच्या काळात काँग्रेसने ग्रामीण भागात सशक्त जनाधार तयार केला होता. त्यांच्या लोकसंग्रह, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख कामांमुळे त्यांनी मतदारांमध्ये आदर प्राप्त केला होता. आज त्याच वारशाचा पुढाकार घेत प्रवीण चौरे जिल्हा संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी युवक आणि नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा जनतेच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास व्यक्त करत प्रवीण चौरे म्हणाले, “पैशाची ताकद नव्हे, तर जनतेचा विश्वास आणि विकासाची दिशा हीच आमची खरी शक्ती आहे”
दरम्यान, धुळे आणि पिंपळनेर परिसरात काँग्रेसच्या बैठका, संघटनात्मक आढावे आणि उमेदवारीच्या चर्चांना वेग आला आहे. जिल्हा काँग्रेसने शहर ते गाव पातळीपर्यंत संवाद मोहीम सुरू केली असून, कार्यकर्त्यांना स्थानिक समस्यांवर उपाययोजना मांडण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विकास, रोजगार, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधा या मुख्य मुद्द्यांवर आधारित प्रचार करतील. जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्थानिक पातळीवर नव्या उर्जेने आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.
