नाशिक – अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे शिवसेनेचा बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता, पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तयारीला वेग देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची भूमिका मांडली होती. त्यांच्या पाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजप उत्तर महाराष्ट्रची बैठक पार पडली. या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील की स्वबळावर, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या रविवारी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला. त्यांच्या पाठोपाठ शुक्रवारी भाजपच्यावतीने स्वामी नारायण केंद्रातील सभागृहात आयोजित उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या निवडणुका महायुतीत लढण्याच्या केलेल्या घोषणेला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण, नाशिक महापालिकेसह अनेक ठिकाणी भाजपने एकहाती वर्चस्व राखण्याची तयारी केली आहे.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीत गतवेळपेक्षा चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नाशिक महापालिकेत भाजपने १०० प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार की, स्वबळावर या प्रश्नावर त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे महायुती एकत्रित लढेल. परंतु, जिथे मित्रपक्षही तुल्यबळ असतील, त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, अशी भूमिका मांडली. म्हणजे राज्यात सर्वच ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढण्यात येणार नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.
महायुतीतील तीनही पक्षांनी पहिल्या दिवसापासून जिथे, जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी महायुती करण्याचे ठरवलेले आहे, ज्या ठिकाणी सर्व मित्र तुल्यबळ आहेत, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील, असे त्यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेत युती झाली तर, १०० प्लस युतीच्या असतील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.