जळगाव – नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसतानाच मंत्री गिरीश महाजन यांना तेथे स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाची संधी मिळाली. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जळगाव जिल्हा आणि आपल्या जामनेरला विसरू नका, असा टोला मंत्री महाजन यांना हाणला आहे. त्या विषयी बोलताना महाजन यांनीही भुजबळ साहेब तुम्ही जळगावची चिंता करू नका. जळगावची एकहाती सत्ता आम्ही घेऊच. मी नाशिकला सुद्धा येईल, असे प्रत्युत्तर त्यांना दिले आहे.

महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा करून अनेक महिने उलटले असले तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शिंदे गटाच्या विरोधामुळे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला यापूर्वीच स्थगिती देण्यात आली असताना, दादा भुसे यांच्या नावावर शिवसेनेचा शिंदे गट अजुनही ठाम आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी नाशिकला नियुक्ती होताच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पुन्हा नवा वाद उफाळून आला. कारण याचवेळी छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार दिला आहे. काय करायचे ते नाशिकमध्येच, असे म्हणत त्यांनी काही वर्षांपूर्वी धुळ्याचे पालकमंत्रीपद नाकारल्याचेही उदाहरण दिले आहे. दुसरीकडे, ध्वजारोहण सोहळ्यानंतर गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण पार पडले आहे. आता हळूहळू पुढे जाऊ, असे वक्तव्य करत भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळूनच अंतिम निर्णय घेतील. आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही ते म्हणाले आहेत. तसेच यासाठी मी कधीच मागणी केली नाही किंवा फलकबाजीही केलेली नाही, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना उद्देशून अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील संघर्षामुळे रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादाला स्वातंत्र्य दिनी गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाची संधी मिळाल्याने वेगळे वळण मिळाले. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जळगाव जिल्हा व आपल्या मतदारसंघाला विसरू नका, याकडे लक्ष वेधत गिरीश महाजनांचे कान टोचले. नाशिक सगळ्यांना आवडते. कुणीही जरूर पुढे जावे. परंतु, जळगावसह त्यांच्या मतदारसंघाला न विसरण्याचा सल्लाही त्यांनी महाजनांना दिला.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचे मिळून एकूण चार मंत्री आहेत. असे असताना जळगावच्या मंत्र्याला नाशिकच्या ध्वजारोहणाची संधी दिली गेली, याबद्दल भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्या खास शैलीत भुजबळांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी जळगावची चिंता करू नये. जळगावची एकहाती सत्ता आम्ही घेणार आहोतच. याशिवाय, माझ्याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे मी नाशिकमध्ये पण येणार आहे. गेल्या वेळी सुद्धा माझ्याकडे नाशिक महापालिकेची सूत्रे होती. कुंभमेळा मंत्री सुद्धा मीच होतो. त्यामुळे कदाचित गंमतीत भुजबळ साहेब बोलले असतील, अशी मिश्किल टिप्पणी मंत्री महाजन यांनी केली.