जळगाव – दिवाळी दारात आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात नैसर्गिक आपत्तीची मदत जमा झालेली नाही. तसेच एक वर्ष उलटले तरी कर्जमुक्तीची घोषणा अंमलात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील धरणगावात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी अनुदान मिळाले पाहिजे, यासाठी धरणगावात महाविकास आघाडीने हंबरडा मोर्चा काढून लक्ष्य वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उड्डाणपुलावर रास्ता रोको, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, बैलगाडीसह शेतकरी हंबरडा मोर्चा काढण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सातबारा उतारा कोरा करुन कर्जमुक्ती करावी, रब्बी हंगामासाठी जाहीर केल्याप्रमाणे १० हजार रूपयांचे अनुदान द्यावे, अतिपावसामुळे पडझड झालेल्या घरांसह मृत्यू झालेल्या पशू-पक्षांचे अनुदान तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, पीक विमा गेल्या वर्षीच्या निकषांप्रमाणे मिळावा, शेतीमालाची हमीभावाने खरेदी करावी, उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या ज्वारीची तत्काळ खरेदी करण्यात यावी, रासायनिक खतांच्या किमती कमी करून त्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते गुलाबराव वाघ तसेच जयदीप पाटील, निलेश चौधरी, भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, लीलाधर पाटील, परमेश्वर महाजन, विजय पाटील, संतोष सोनवणे, कृपाराम महाजन, राहुल रोकडे, शुभम महाजन, गजानन महाजन, विनोद रोकडे, रमेश पारधी, वसंत पारधी, सुनिल चव्हाण, भाऊसाहेब किरण मराठे, जितेंद्र धनगर, रणजित सिकरवार, सतिष बोरसे, कैलास चौधरी, भीमराव धनगर, गोपाल चौधरी, गजानन महाजन, प्रेमराज चौधरी, गोपाल महाजन, वसीम खान, मनोज पटूणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाळासाहेब पाटील, गोविंद कंखरे, भरत मराठे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, कल्पिता पाटील, एकनाथ पाटील, भगवान शिंदे, आबा पाटील, परेश गुजर, मोहीत पवार, दिनकर पाटील, लक्ष्मणराव पाटील, खलील खान, गोपाल माळी, सुभाष पाटील, अमित शिंदे, नारायण चौधरी, रामकृष्ण पवार, प्रमोद पाटील, राहुल पाटील, साजिद कुरेशी, प्रफुल पवार, जुनेद बागवान, काँग्रेसचे सम्राट परीहार, रामचंद्र माळी, महेश पवार, नंदलाल महाजन, सुनील बडगुजर, योगेश येवले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.