जळगाव : जिल्ह्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हा प्रभारी व निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या असून, प्रत्येकाला जबाबदारीचे वाटप केले आहे. तुलनेत महाविकास आघाडीत शांतता असताना, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आणखी दोन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जळगावमध्ये ठाकरे गटाचे आता तीन जिल्हाप्रमुख झाले आहेत.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे तिन्ही घटक पक्ष जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडीतही शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादीची (शरद पवार) अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. गेल्या वर्षभरात पार पडलेल्या लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या महाविकास आघाडीतील शरद पवार गटासह ठाकरे गट आणि काँग्रेसची आणखी गलितगात्र अवस्था झाली. अचानक वाऱ्याची दिशा बदलल्याने तिन्ही पक्षांना मोठी गळती लागली. नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे उद्भवलेले वाद मेळाव्यांमधून चव्हाट्यावर आले. त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न विशेषतः शरद पवार गट आणि ठाकरे गट करताना दिसले.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले गेले आहे. परंतु, पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांमुळे कुठेतरी पक्षांचे संघटन खिळखिळे होण्याचे प्रकार अधुनमधून घडताना दिसतच आहे.

संबंधितांना समज देण्यासह वेळ प्रसंगी बाहेरचा रस्ता दाखविण्याची कार्यवाही देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वीही ठाकरे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत आणि शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील यांनीही पक्ष विरोधी कारवाया केल्या होत्या. त्यामुळे त्यांची ठाकरे गटातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली होती. विशेष म्हणजे ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाप्रमुख राजपूत आणि पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.

पक्षाच्या ध्येय धोरणांना मूठमाती देऊन पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, हा संदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजपूत आणि पाटील यांच्या हकालपट्टीतून दिला होता. अर्थात, दीपक राजपूत यांच्या हकालपट्टीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा दुसऱ्या जिल्हाप्रमुखाची नियुक्ती करताना यावेळी ठाकरे गटाने थोडी वेगळी रणनिती अवलंबली आहे. गेल्या वेळी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केले गेले होते. त्यानुसार, जळगावची जबाबदारी कुलभूषण पाटील यांच्याकडे तर रावेरची जबाबदारी दीपक राजपूत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, राजपूत यांची हकालपट्टी केल्यानंतर पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आता दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत.

जिल्हाप्रमुख आणि त्यांची जबाबदारी

  • कुलभूषण पाटील (जळगाव लोकसभा)
  • चंद्रकांत शर्मा (चोपडा, भुसावळ)
  • योगीराज पाटील (रावेर, जामनेर, मुक्ताईनगर)