नाशिक – शहरात चालू वर्षात ४२ हत्या झाल्या आहेत. नाशिक हे सांस्कृतिक शहर आहे. काही ठिकाणी अल्पवयीन मुले नशा करून गुन्हे करतात. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्या.
शहरातील ढासळती कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख या विषयावरून मध्यंतरी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढला होता. महापालिका निवडणुकीत विरोधकांनी हा मुद्दा प्रचारात आणण्याची तयारी केली आहे. अलीकडेच हत्या आणि गोळीबाराच्या वेगवेगळ्या प्रकरणात भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक झाली. यावरून विरोधकांकडून सत्ताधारी व मुख्यत्वे भाजपला लक्ष्य केले असताना शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावर बैठक घेतली.
शहरातील गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त किशोर काळे, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलांकडून घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेता शहरात तपासणी मोहीम राबवावी. रात्रीची गस्त वाढवावी, अशी सूचना भुसे यांनी केली. शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याची गरज त्यांनी मांडली. बैठकीत आयुक्त कर्णिक यांनी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याच्यादृष्टीने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
बैठकीनंतर मंत्री भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलीस कायद्याच्या चौकटीत काम करीत असल्याचे नमूद केले. अल्पवयीन गुन्हेगारी संदर्भात राज्यस्तरावरून कायद्यात काय बदल केला जाऊ शकतो. हा मुद्दा देखील शासनाच्या विचाराधीन आहे. पुढील काळात पोलीस रस्त्यावर दिसतील. गुन्हेगारांवर कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पोलीस यंत्रणेवर कुणाचाही दबाव नसल्याचा दावा केला. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असेल तरी कारवाई होईल, असे भुसे यांनी नमूद केले.
शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत राखण्यााच्या दृष्टीने महापालिकेला सूचना केल्या जातील. रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी नमूद केले.