नाशिक : भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, पदाधिकाऱ्यांनी बरीच मनधरणी करूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांनी माघार न घेता निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवल्याने महायुतीसमोरील अडचणीत भर पडली आहे. मागील निवडणुकीत महाराजांनी नाशिकमधून माघार घेतली होती. तेव्हा नाशिकसह अन्य मतदारसंघात भक्त परिवार सक्रिय प्रचारात उतरल्याने अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचा दावा खुद्द महाराजांनी केला होता. त्याची परतफेड यंदा तिकीट देऊन होईल, ही अपेक्षा फोल ठरल्याने शांतिगिरींनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

उमेदवारी अर्ज भरताना महाराजांनी हजारो भक्तांच्या सोबतीने भव्य फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांची उमेदवारी त्रासदायक ठरेल, हे लक्षात घेत भाजपचे नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मंत्रिपदाचा दर्जा, मंदिर समितीचे अध्यक्षपद, भविष्यात राज्यसभेसाठी विचार अशी आश्वासने दिली गेल्याचे सांगितले जाते. परंतु, महाराज कोणत्याच प्रलोभनाला बधले नाहीत. अनेक नेत्यांनी मनधरणी करूनही त्यांनी माघार घेतली नाही. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत बराच संघर्ष झाला होता. तीनही पक्षांच्या सहमतीने आपणास उमेदवारी मिळण्याची आस ते बाळगून होते. या काळात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जागा कुठल्याही पक्षाला मिळो, उमेदवारी आपणास मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता. शिवसेनेचा उल्लेख करीत त्यांनी एक अर्ज दाखल केला होता. एक, दीड महिन्याच्या घोळानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाली. पक्षाने विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना रिंगणात उतरवत महाराजांचा विचारही केला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी कायम ठेवत महायुतीची कोंडी करण्याचे धोरण महाराजांनी ठेवल्याचे दिसून येते. ‘भारत मातेच्या आशीर्वादाने, जनता जनार्दनाने ठरवले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. निवडणूक लढायची आणि जिंकायची’ असे सांगत महाराजांनी शड्डूू ठोकले आहेत.

हेही वाचा : नाशिकमध्ये चौरंगी, दिंडोरीत तिरंगी लढत

महाराजांच्या माघारीसाठी ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार चर्चा करूनही यश आले नाही. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणे योग्य नसल्याचे महाराजांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी ही देशाची निवडणूक आहे. मतदार विचार करतील, असे शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिक : आगीत बारदान गोदाम खाक, अनेक दुकानांचे नुकसान

दिंडोरीत गावित, चव्हाण यांची माघार

दिंडोरी मतदारसंघात माकपचे उमेदवार जे. पी. गावित आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रातोरात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यावर संपर्कप्रमुख व उपनेतेपदाची जबाबदारी सोपविली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली. नाशिकमधून अपक्ष उमेदवारी करुन बंडखोरीचा पवित्रा घेणारे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल जाधव यांची समजूत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढावी लागली. ही जागा शिवसेनेला गेली असून त्यांना आपण पूर्ण समर्थन दिले पाहिजे. जाधव यांना भविष्यात योग्य संधी देण्यासाठी पक्षात चर्चा केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर माघारीची मुदत संपत असताना जाधव यांना अक्षरश: धावतपळत जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी माघार घेतली.