नाशिक: अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांचे ताबूत थंड करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. दिंडोरी मतदारसंघात यश आले तर, नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांना थांबविण्यात महायुती अपयशी ठरली. नाशिकमधून पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१ उमेदवार तर, दिंडोरीतही पाच जणांनी माघार घेतल्याने १० उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये चौरंगी तर, दिंडोरीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छाननीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात ३६ आणि दिंडोरीत १५ उमेदवार मैदानात होते. दोन्ही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान होते. त्यांना शांत करण्यासाठी दोन दिवसांत युध्दपातळीवर प्रयत्न झाले. माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय करंजकर, निवृत्ती अरिंगळे, शशिकांत उन्हवणे, अनिल जाधव आणि किसन शिंदे यांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाारी जलज शर्मा यांनी दिली. दिंडोरी मतदारसंघात माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह धोंडीराम थैल, शिवाजी बर्डे, अशोक घुटे यांनी माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सांगितले. महायुती आणि महाविकास आघाडीला नाशिक आणि दिंडोरीत बंडखोरांची समजूत काढण्यात यश आले असले तरी अपक्ष उमेदवारी करणारे शांतिगिरी महाराज यांची मनधरणी अनेकांनी करुनही उपयोग झाला नाही.

हेही वाचा : नाशिक : आगीत बारदान गोदाम खाक, अनेक दुकानांचे नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख राजकीय पक्षांची बंडखोरांच्या माघारीसाठी धावपळ सुरू होती. नाशिकमधून अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरी करणारे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल जाधव यांना तर मुदत संपण्यास दोन, तीन मिनिटे बाकी असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह अन्य पदाधिकारी घेऊन आले. वेळेत अर्ज दाखल व्हावा, यासाठी संबंधितांना पळतच निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठावे लागले.

हेही वाचा: नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाराजवंतांची समजूत

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, महायुतीचे हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदार संघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता मोठ्या संख्येने असणारे अपक्ष कुणाला कसे त्रासदायक ठरतील, याचे आडाखे बांधले जात आहेत. दिंडोरी मतदारसंघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची समजूत काढण्यात भाजपला तर, माकपचे उमेदवार जिवा पांडूू गावित यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश आले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवरून गावित नाराज होते. ही नाराजी त्यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर मांडली. माघारीनंतर दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती थवील यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. या मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात आहेत.