नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत अनेक राजकीय पदाधिकारी, नेत्यांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून ठेवत इकडून तिकडे उड्या मारल्या आहेत. त्यातही राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जाण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या पक्षबदलू वृत्तीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला (उध्दव ठाकरे) आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) यांना बसला आहे. अर्थात, सध्या पक्ष बदललेली मंडळी नवीन पक्षातही किती दिवस राहतील, हे खुद्द तेही सांगू शकणार नाहीत. बघू या, तरी कोणी, कोणत्या पक्षातून, कोणत्या पक्षात उड्या मारल्या.
विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढविलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवारांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. अद्वय हिरे यांनी आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप, शिवसेना अशा अनेकदा इकडून तिकडे उड्या मारल्या आहेत.
२०२१ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये दाखल झाले. पुढे काही महिन्यांतच शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. हिरे यांचे कट्टर विरोधक दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाले. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर राजकीय अडचण झाल्याने अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे गटाचा रस्ता धरला. मागील विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात ठाकरे गटाने भुसे यांच्या विरोधात हिरे यांना उमेदवारी दिली होती. निकालात हिरे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले होते. अद्वय हिरे यांच्या पाठीमागे जिल्हा बँक घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ असल्याने त्यांनी भाजपला जवळ केल्याची चर्चा आहे.
याशिवाय येवला येथील शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, माजी आमदार मारोतीराव पवार यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. संभाजी पवार यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द लढवली होती. तेच आता भुजबळ यांना जाऊन मिळाले आहेत. मारोतीराव पवार हे १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसकडून तर १९९० मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले होते.
इगतपुरी नगरपरिषदेवर सुमारे २५ वर्षांपासून वर्चस्व राखणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. इंदुलकर हे ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात होते. परंतु, भाजपने त्यांना आफल्याकडे खेचले. दिंडोरीत भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या महिन्याच्या प्रारंभीच धक्के दिले. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सुनिता चारोस्कर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मागील विधानसभेची निवडणूक लढवली होती. दिंडोरी तालुक्यालगतच्या निफाड तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्याबरोबर असणारे भास्करराव बनकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर आणि भास्करराव बनकर हे जुने राजकीय वैर विसरुन एकत्र आले आहेत.
सिन्नर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लढलेले उदय सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिन्नरमध्येच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते नामदेव लोंढे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका आणि ठाकरे गटाचे नेते हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही तर मोठ्या नेत्यांनी मारलेल्या कोलांटउड्यांची जंत्री आहे. याशिवाय, किती लहान पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदललेृ, त्यांची तर गणतीच नाही.
