नाशिक – मराठी भाषेसंदर्भात मुंबई येथे आयोजित मेळाव्यात उध्दव ठाकरे यांच्यासह एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युतीसंदर्भात चकार शब्द काढत नसताना पदाधिकाऱ्यांचा सूर मात्र युतीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. इगतपुरी येथे आयोजित राज्यस्तरीय शिबिरात दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या सत्रात राज ठाकरे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात आपली भावना मांडली.
बहुतेकांनी युतीच्या बाजूने मत मांडल्यानंतर राज यांनी यासंदर्भात योग्यवेळी, योग्य निर्णय घेतला जाईल, याचा पुनरुच्चार केला. तोपर्यंत सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळ लक्षात घेऊन मुख्यत्वे या याद्यांवर काम करावे, अशी सूचना केल्याचे सांगण्यात आले.
इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्ट येथे मनसे पदाधिकाऱ्यांचे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर चालू आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दोन तास त्यांनी पदाधिकाऱ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात चर्चा केली. शिबिरातील घडामोडींची माहिती सायंकाळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
युतीसंदर्भात कार्यकर्त्यांनी आपली भावना मांडली. दोन्ही ठाकरे बंधूंची युती व्हावी, ही महाराष्ट्राची भावना आहे. आमची भावना ती महाराष्ट्राची भावना आहे. राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शरद पवार यांच्याशीही चांगले संबंध आहेत. इतर लोक संभ्रमात असतील तर त्याला काय इलाज. असा प्रश्नही नांदगावकर यांनी उपस्थित केला. संघटन महत्वाचे असून उद्या पक्षाने एकला चलो रे ही भूमिका घेतली तरी त्यात काही वावगे नाही. युतीसंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे हेच निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केेले.
शिबिरात शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज यांच्याशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले. मतदार यादीतील दुबार नावे शोधावीत, असे त्यांनी सूचित केले.
राज ठाकरे दुसऱ्या दिवशीच मुंबईकडे परत
इगतपुरी येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय शिबिराला सोमवारी कोणताही गाजावाजा न करता सुरुवात झाली. शिबीर तीन दिवसांचे असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही दिवस शिबिरात उपस्थित राहतील, असा पदाधिकाऱ्यांचा अंदाज होता. परंतु, शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारीच राज ठाकरे हे मुंबईकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे शिबिराच्या शेवटच्या दिवशी कोण मार्गदर्शन करणार, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना आहे.