नाशिक – पावसाने झोडपल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांसह नागरिकांना धीर देण्यासाठी आता मंत्री, आमदार, खासदार आपआपल्या भागात पुढे सरसावले आहेत. त्यासाठी चिखल तुडवू लागले आहेत. शेताच्या बांधापर्यंत जाऊ लागले आहेत. गुडघ्याइतक्या पाण्यात उतरु लागले आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ पावसाने सर्वाधिक नुकसान झालेल्यांपैकी एक. मंत्री भुजबळ हे मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाण्यात उतरले. खासदार भास्कर भगरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही पाहणी केली.
नैसर्गिक संकटात शेतकरी आणि नागरिकांना कोणीतरी येऊन धीर देणे महत्वाचे असते. तेच काम आता लोकप्रतिनिधी करु लागले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागांच्या प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी दिली.
आपत्तीग्रस्त कुटुंबांना १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ, तसेच गहू नको असतील, त्यांना तेवढेच तांदूळ वाटप करावेत, प्रति कुटुंब तीन किलो डाळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यकतेनुसार आपपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्यास सांगितले. लोकांचे जीव वाचविण्यास आपले प्राधान्य आहे. त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या भागात मंत्री भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. त्यानंतर येवला शहरातील हुडको कॉलनीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने उदभवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. सावरगाव, पाटोदा तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथेही पाहणी केली.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार भास्कर भगरे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनीही येवल्यातील हुडको भागाची पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच सुरेगाव, अंदरसुल, नागडे या गावांमध्येही पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.