नाशिक – पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रविवारी जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणासह १३ धरणांतील विसर्गात मोठी वाढ करण्यात आली. पावसाचा जोर कायम राहिल्याने विसर्ग आणखी वाढण्याची चिन्हे असून गोदावरी, दारणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाणी आले असून गोदावरी दुथडी भरून वहात आहे.

रविवारी सकाळपासून शहरासह अनेक भागात संततधार सुरु आहे. सायंकाळपर्यंत त्याचा जोर कायम होता. हंगामाच्या प्रारंभापासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा ३४ हजार ३४१ दशलक्ष घनफूट म्हणजे ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण परिचालन सूचीनुसार जुलैच्या पूर्वार्धात किती जलसाठा करता येतो, हे प्रमाण निश्चित असते. ही पातळी आधीच ओलांडली गेली असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे. पाणलोट आणि धरण क्षेत्रात पावसाची तीव्रता अधिक आहे.

आंबोली भागात तुफान पाऊस झाला. मागील २४ तासात तिथे १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भावली धरण क्षेत्रात (१२९), करंजवण (९७), इगतपुरी (९०), आळंदी (७५), त्र्यंबकेश्वर (७०), दारणा (४२), मुकणे (५७), भाम (९०), वालदेवी (४५), गंगापूर (५५), गौतमी गोदावरी (७७) मिलीमीटर पाऊस झाल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. पावसाने अनेक धरणांमध्ये येवा वाढल्याने विसर्गात मोठी वाढ करावी लागली.

धरणनिहाय विसर्ग

त्र्यंबकेश्वर, आंबोली भागातील पाणी गंगापूर धरण समूहात येते. या भागातही पाऊस कोसळत आहे. तशीच स्थिती इगतपुरी तालुक्यात आहे. यामुळे अनेक धरणांच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे. रविवारी दुपारी गंगापूरमधून ५१८६ क्युसेक, दारणा ((८५८०), नांदूरमध्यमेश्वर (२७९८०), भावली (७०१), भाम (३५२२), वाकी (५०५), पालखेड (६५४), कश्यपी (५००), पुणेगाव (१००), भोजापूर (७६), वालदेवी (७६), आळंदी (३०) क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. मुकणे धरणातून दुपारी ४०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला.

पाटबंधारे विभागाचे आवाहन

गंगापूर धरणातून विसर्ग वाढत असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदी काठालगतच्या भागात सतर्कता बाळगावी, असे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी महापालिकेला सूचित केले आहे. दुपारी गोदावरीच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. शहर परिसरात पावसाचा जोर वाढला. गंगापूरमधून सोडलेले पाणी आणि शहरातील पावसाच्या पाण्याने होळकर पुलाखालील पातळी जवळपास आठ हजार क्युसेकवर पोहोचली होती.

गंगापूर, दारणा व पालखेड समूहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून पुढे मार्गस्थ होते. दारणा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. गोदावरीच्या पात्रात सुमारे २८ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असून तो वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.