नाशिक – रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुती पुन्हा सत्तेत आल्यापासून कायम असून महायुतीतील तीनही पक्ष नाशिकच्या पालकमंत्रीपदावर हक्क सांगत असताना अचानक राष्ट्रवादीने (अजित पवार) काहीशी माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जळगाव येथे केलेल्या वक्तव्यातून हे ध्वनित होत असल्याने नाशिकमध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही चक्रावले आहेत.

महायुती सरकारने रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करून अनेक महिने उलटले आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही आहेत. तीनही पक्ष अडून बसल्याने नाशिक पालकमंत्रीपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. जानेवारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले होते.

रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती जाहीर केली होती. परंतु, ही नियुक्ती जाहीर होताच या दोन्ही नावांना महायुतीतच तीव्र विरोध झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना चोवीस तासांच्या आत या नियुक्तीस स्थगिती देणे भाग पडले होते. तेव्हापासून दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्तच आहे. पालकमंत्रीपदावरुन महायुतीतच राजकीय रस्सीखेच अजूनही सुरु आहे. शिंदे गट नाशिक जिल्ह्यात केवळ दोनच आमदार असतानाही दादा भुसे यांच्या नावासाठी आग्रही आहे.

अजित पवार गटाचा पालकमंत्रीपदावर हक्क असल्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ सांगत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांना स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजवंदनाची संधी दिल्यानंतर नाराज झालेले छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजवंदनास जाण्यास नकार दिला. प्रारंभी त्यांनी तब्येतीचे कारण पुढे केले होते. नंतर जे करायचे ते नाशिकमध्येच, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.

नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सात आमदार असल्याने पालकमंत्रीपदावर हक्क सांगण्याची आवश्यकता असल्याचे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्याकडेच पालकमंत्रीपद असावे, यासाठी प्रयत्न करत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तर, जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल, असा दावाही केली होता. अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी ज्याप्रमाणे जोर लावत आहे, त्याप्रमाणे नाशिकसाठी जोरदार आग्रह धरत नसल्याचे दिसत आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव येथे नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत केलेले वक्तव्य सूचक म्हणावे लागेल.

थेट नाव न घेता भुजबळ यांना लक्ष्य करतानाच अजित पवार यांनी नाशिकविषयी काहीशी मवाळ भूमिका घेतली. कुणाला मंत्री करायचे आणि कुणाला पालकमंत्री करायचे, हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि त्यासाठी ते सक्षम आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री वेळ आल्यावर घेतील. पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे किंवा नाही, याकडेही ते लक्ष देतील. प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. त्यांना तो अधिकार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतून अजित पवार गटाने अंग काढून घेतले की काय, असा संभ्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.