नाशिक – रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये राज्य परिवहन महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नाशिक विभागाचा एक कोटी ५३ लाख रुपयांच्या उत्पन्नाचा त्यात वाटा आहे.

दरवर्षी महामंडळाला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीणण भावाकडे जात असल्याने प्रवासी संख्येत वाढ होते. त्यामुळे रक्षाबंधनच्या सणावेळी महामंडळाला कायमच विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नाशिक आगाराची बससेवा जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात दिली गेली. रक्षाबंधन आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त २७० बस धावल्या. विभागातील १३ आगारांनी बससेवेचे योग्य नियोजन व सांघिक कामगिरी केल्याने विभागाने श्रावणातील तिसऱ्या सोमवारपर्यंत तीन लाख,२६ हजार ८९६ किलोमीटर अंतर पार करत एक कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले असल्याची माहिती विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी दिली. अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात ८२० बसेस त्यात शिवशाही, ई-बस, शिवनेरी नियोजनानुसार धावल्या. रक्षाबंधनावेळी नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, अहिल्यानगर, धुळे यासह वेगवेगळ्या ठिकाणी बस धावल्या. यासाठी चार हजारांहून अधिक कर्मचारयांनी दिवसरात्र काम केले. यामुळे एक कोटी ५३ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सेवेचा लाभ घ्यावा. – किरण भोसले (विभाग नियंत्रक, नाशिक आगार).