नाशिक : विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये घेण्याचा सल्ला देणारे मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे. देशात लोकशाही आहे. दडपशाही नाही. देश संविधानाने चालतो, कोणाच्या मर्जीेने चालत नाही. सगळेच ईडी, सीबीआयला घाबरत नसल्याचा टोलाही त्यांनी महाजनांना हाणला.

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आदी पक्षाचे राज्यभरातील नेते शहरात दाखल झाले आहेत. मोर्चा निघण्याआधी खा.सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाचा समाचार घेतला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळवण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये घेऊन विरोधकांचे तोंड एकदाचे बंद करा, असा सल्ला मंत्री महाजन यांनी भाजप जळगाव पूर्वच्या कार्यशाळेत दिला होता. जळगाव जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांना मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात कितीतरी लोक भाजपवर टीका करणारे होते. परंतु, आज ते भाजपमध्ये आल्यावर गप्प झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर खा. सुळे यांनी देशात लोकशाही असून दडपशाही नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांना ठणकावले. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालतो. कोणाच्या मर्जीने चालत नाही. सगळेच ईडी. सीबीआयला घाबरत नाही. काही आमच्यासारखे लोक आहेत जे लोकशाहीवर विश्वास ठेवतात. सशक्त लोकशाहीत विरोधकांंचे स्थान महत्वाचे असल्याचे खा. सुळे यांनी सूचित केले.

आरक्षणा संदर्भातील प्रश्नावरून खा. सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय बैठक आणि विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. समाजातील सर्व घटकांच्या मागण्यांवर चर्चा करा. लोकशाही आहे, दडपशाही नाही. विरोध केला म्हणून चल भाजपमध्ये हे दुदैव आहे. कधीकाळी राज्यातील भाजप हा गंभीर पक्ष होता. त्यांचे सुसंस्कृत नेते आपण पाहिले आहेत. मात्र पूर्वीचा भाजप आणि आजचा भाजप यांच्यात जमीन आस्ममानचा फरक असल्याकडे खा. सुळे यांनी लक्ष वेधले.