नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच जिल्ह्यात शिवसेनेला (उध्दव ठाकरे) हादरे बसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढविलेल्या दोन उमेदवारांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला.

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी मुंबईतील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. अद्वय हिरे यांनी आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप, शिवसेना असे अनेकदा इकडून तिकडे पक्षांतर केले आहे. २०२१ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये दाखल झाले. पुढे काही महिन्यांतच शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. हिरे यांचे कट्टर विरोधक दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाले. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर राजकीय अडचण झाल्याने अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे गटाचा रस्ता धरला. मागील विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघात ठाकरे गटाने भुसे यांच्या विरोधात हिरे यांना उमेदवारी दिली होती. निकालात हिरे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले होते. अद्वय हिरे यांच्या पाठीमागे जिल्हा बँक घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ असल्याने त्यांनी भाजपला जवळ केल्याचे म्हटले जाते.

येवला येथील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, माजी आमदार मारोतीराव पवार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. संभाजी पवार यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द लढवली होती. संभाजी आणि मारोतीराव हे दोघे ठाकरे गटात येण्याआधी राष्ट्रवादीत कार्यरत होते. मारोतीराव पवार हे १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसकडून तर १९९० मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले होते. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब खैरनार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन कोकाटे, शिवसेना उपतालुका प्रमुख व येवला माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते, 

येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण गायकवाड, येवला माजी सभापती मंगेश जाधव, येवला शिवसेना उप तालुका प्रमुख चंद्रकांत शिंदे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गणपत भवर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे आदींनीही अजित पवार गटात प्रवेश केला. येवला नगरपरिषद निवडणुकीत तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीत अजित पवार गटास या प्रवेशाचा लाभ होण्याची शक्यता आहे.