पनवेल – दिवाळीचा सण म्हटलं की घराघरात अभ्यंगस्नान, सुगंधी उटणं आणि जल्लोषाने भरलेली सकाळ ! असे वातावरण असणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा कामोठेकरांच्या दिवाळीला पाण्याऐवजी कोरड्या नळांचा आणि आंदोलनाचा गंध दरवळला. अभ्यंगस्नानाऐवजी रिकाम्या हंडा घेऊन नागरिकांना सिडकोच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली. “कधी मिळणार पाणी?” या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने नागरिकांचा रोष उफाळला आणि ‘सुरेल पहाटे’च्या सणात संतापाची पहाट उजाडली.
कामोठे सेक्टर १९ येथील रहिवाशांनी दिवाळीच्या सकाळी अभ्यंगस्नानाऐवजी सिडकोच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला. “आम्हाला पाणी हवं, आश्वासन नको!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसोबत गेलेल्या शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारत “जर पाणी देता येत नसेल, तर खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल थांबवा,” असा इशारा दिला.
याच दरम्यान, खारघर उपनगरामधील स्वप्नपूर्ती सोसायटीत रविवारीपासून अवघ्या २० मिनिटांचा पाणीपुरवठा सुरू असल्याने रहिवाशांचा संताप पुन्हा भडकला आहे. काही दिवसांपूर्वी लोकसत्ताने या भागातील पाणीटंचाईवर प्रकाश टाकल्यानंतर थोडक्यात सुधारणा झाली होती, मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे “पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन बांधकामांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका” अशी मागणी पुन्हा केली आहे. याआधीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी सिडको भवनात आंदोलन करून ‘नवीन प्रकल्पांना परवानगी रोखण्याची’ मागणी केली होती. त्या वेळी मुख्य अभियंता शिला करुणाकरन यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु आज त्याच आश्वासनाचा सिडकोला विसर पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सध्या सिडको मंडळाला ३७५ एमएलडी पाण्याच्या मागणीच्या तुलनेत फक्त ३५० एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अतिरिक्त २५ एमएलडी पाण्याची मागणी केली असली, तरी प्रतिसाद मिळालेला नाही.