-
जवळजवळ दोन दशकांनंतर, वरळी येथील विजयी मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय असणारे दोन जीआर रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने हा विजयी मेळावा आयोजित केला होता.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील.”
-
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोलाही लगावला आहे. ते म्हणाले, “विजयी मेळावा मराठीचा होता, पण त्यामध्ये रुदालीचं भाषणही झालं. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता ‘आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला निवडून द्या’ हेच ऐकू आलं.”
-
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं, “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीसाठीच शिवसेना स्थापन केली होती. त्यामुळे मराठीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं स्वाभाविक आहे. त्यांच्या एकत्र येण्याला आमचा विरोध नाही, शुभेच्छाच आहेत.”
-
मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त विजयी मेळाव्यावर टीका केली. या मेळाव्याला त्यांनी “समाजात फूट पाडण्यासाठी आणि राज्य कमकुवत करण्यासाठी आयोजित केलेला जिहादी व हिंदूविरोधी मेळावा” असल्याचं म्हटलं.
-
भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, “या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची आगतिकता दिसत होती. ते त्याठिकाणी रुदालीच्या भूमिकेत दिसत होते.”
-
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “राज्य सरकारने हिंदी लादण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मेळाव्यात फक्त राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी भाषेचा उल्लेख होता, परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मराठीचा उल्लेख नव्हता. त्यांच्या पराभवाचं दुःख त्यांच्या भाषणात जाणवत होतं.”
-
दरम्यान या मेळाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य: @ShivSenaUBT_/X)
“मराठीबद्दल एक शब्दही न बोलता…”, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर कोण काय म्हणाले?
Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचे दोन जीआर रद्द केल्यानंतर हा मेळावा दोन्ही पक्षांसाठी राजकीय विजयाचे प्रतीक आहे.
Web Title: Uddhav thackeray raj thackeray marathi bhsahs shiv sena ubt shiv sena mns bjp eknath shinde devendra fadnavis sanjay raut aam