अहिल्यानगर : महापालिका निवडणुका दृष्टिक्षेपात येऊ लागली तशी नगर शहरातील धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे. एकामागे एक साखळी पद्धतीने या घटना पुढे येत आहेत. काही वर्षांपूर्वी असेच प्रकार निवडणुकांचे वेध लागले असताना घडत. मध्यंतरी त्याला राजकीय नेत्यांचे सामंजस्य आणि पोलीसांची कठोर भूमिका यामुळे अटकाव बसला.
परंतु या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसते आहे. त्याचा फटका नगरच्या सामाजिक शांततेला आणि औद्योगिक क्षेत्राला बसत आहे. शहरात धार्मिकस्थळांची तोडफोड असो की रस्त्यावर गोमांस फेकल्याचे प्रकरण आणि आता घडलेले रांगोळीतून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण असो की रस्त्यावर लावलेले चीथावणीखोर फलक. या साऱ्यातून शहरातील राजकीय वातावरण पेटत आहे. या प्रत्येक घटनेमध्ये विरोध आणि समर्थन करणारे असे दोन गट आहेत. त्यातून आपला राजकीय तवा तापवणारेही दोन गट आहेत.
नगर शहर हे हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर पुर्वी आक्रमक राहिले. यातूनच महापालिकेवर अनेक वर्षे एकत्रित शिवसेनेची सत्ता होती. या एकत्रित शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन आणि शिवसेनेत पडलेली फुट, यानंतर नगर शहरात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारित नेतृत्व करण्याची पकड ढिली झाली. यावर लक्ष ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी अचानक आपल्या भूमिकेत बदल करत आक्रमक हिंदुत्वाची वाटचाल सुरू केली.
आमदार जगताप यांची यापूर्वीच्या दोन कार्यकाळातील भूमिका आणि आता तिसऱ्या वेळेची भूमिका यामध्ये जमीन-आसमानचा फरक पडलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षाची भूमिका शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांची असल्याचे सांगत असले तरी शहरात मात्र आमदार जगताप यांनी वेगळी वाटचाल सुरू केली आहे.
आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडण्यासाठी आमदार जगताप भाजपच्या इतर आमदारांसमवेत राज्यभर दौरे करू लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाचेही त्यांना पाठबळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले दिसते.
त्यातूनच शहरात घडणाऱ्या घटनांवर भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गटही सोयीस्कर मौन बाळगून आहेत. शहरातील या वातावरणाच्या विरोधात लढा उभारून अस्तित्व निर्माण करण्याची कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटास संधी असूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच विरूद्ध बाजूने एमआयएम पक्ष सक्रिय होताना दिसत आहे.
एमआयएमचे नेते खासदार अससुद्दीन ओवेसी यांची आयोजित केलेली, परंतु ऐनवेळी रद्द झालेली सभा हा त्याचाच भाग होता. एमआयएमसारखे पक्ष सक्रिय होण्याचा फटका महाविकास आघाडीलाच अधिक बसणारा आहे. ध्रुवीकरणाचा लाभ महायुतीला होणारा आहे.
विशेष म्हणजे अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वी गणेशोत्सव व मोहरम विसर्जन मिरवणूक एकत्र येऊनही शहराने सामंजस्य दाखवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नव्हता. राजकीय नेतृत्व आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचाही त्याला हातभार लागला होता. मात्र आता तणाव निर्माण करणाऱ्या घटनांचा मागोवा घेतला तर त्यात वाढ होताना आणि त्यातून शहराची वाटचाल पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्ववादाकडे निघाल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका केव्हा होतील याचा अंदाज न्यायालयीन प्रक्रियेमुळे पदाधिकाऱ्यांना येत नव्हता. आता मात्र या निवडणुका दृष्टिक्षेपात येऊ लागल्या तशा या घटनांमध्ये वाढ होताना आढळत आहेत. शहराने या वातावरणाचा अनुभव यापूर्वीही घेतला आहे. त्याचा फटका औद्योगिक क्षेत्रास, बाजारपेठांनाही बसला आहे.
नगरच्या औद्योगिक क्षेत्रापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. रोजगारासाठी युवकांचे मोठे स्थलांतर होत आहे. लागोपाठच्या तणावांच्या घटनांमध्ये याकडे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी होरपळला असताना या घटनांत खंड पडलेला नाही. त्यामुळेच मागील चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसत आहे.