अलिबाग– राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि मित्रही नसतो असे म्हणतात. रायगड जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय येतो आहे. दहा नगरपालिकांच्या निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यात युती आघाडीचे नवनविन समिकरणे जिल्ह्यात पहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर आपआपले अस्तित्व कायम राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोयीस्कर आघाडीची भूमिका स्विकारली आहे. सोयीस्कर आघाड्यांच्या या रायगड पॅटर्नची सध्या चांगली चर्चा आहे.

कर्जत खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) चक्क महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अलिबाग नगर पालिकेत शेकापने पांरपारीक विरोधक असलेल्या काँग्रेसशी जुळवून घेतले आहे. मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला बेदखल केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला इथे स्वबळावर उमेदवार उभे करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या बाजूला शेकापच्या आघाडीला रोखण्यासाठी भाजप शिवसेनेची इथे युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कविता प्रविण ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना भाजपयुतीची कोंडी केली आहे.

महाड आणि मुरुड जंजिरा येथे शिवसेना शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. रोहा, श्रीवर्धन येथे महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अलिबागमध्ये युती करणारे शिवसेना शिंदे गट आणि भाजप उरणमध्ये एकमेकांविरोधात लढतांना दिसणार आहे.

सत्तेच्या राजकारणात बेरजेचे गणित मांडतांना पुरोगामित्व, समाजवाद, हिदूत्व, धर्मनिरपेक्षता या मुद्दे बाजूला ठेऊन सोयीस्कर आघाडीची करण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. मात्र राजकीय समिकरणांची गुंतागुत समजुन घेण्यात मतदारांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कर्जत, खोपोली, अलिबाग, मुरुड जंजिरा आणि महाड नगरपालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी व्हावी यासाठी मोर्चेबांधणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या नावाखाली महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जुळवून घेण्याचे धोरण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्विकारले आहे.

युती आघाडीचे सोयीस्कर पॅटर्न रायगडला नवा नाही. यापुर्वीही नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत अशा वेगवेगळ्या आघाड्या पहायला मिळाल्या होत्या. बेरजेचे राजकारण करतांना सर्वच राजकीय पक्षांनी लवचिक धोरण स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. यातुनच सोयीस्कर आघाड्यांचा रायगड पॅटर्न समोर आला आहे. युती आघाडीच्या सोयीस्कर पॅटर्नला मतदार कशा पध्दतीने स्विकारणार हे ३ तारेखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.