छत्रपती संभाजीनगर : कर्जमाफीच्या मागणीचा आवाज शिवसेना ठाकरे गट उंचावत असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलना दरम्यान सरकारने त्याचे श्रेय नागपूरच्या आंदोलनाकडे जाईल, याची काळजी घेतली. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. जूनपर्यंत कर्जमाफीचा विषय निकाली काढण्याचे संकेत दिल्यानंतर कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेचाच हे ठसविण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्याचा दौरा करत आहेत.

अतिवृष्टीचे पॅकेज मान्य नाही, असे सरकारला सुनावत त्यांनी कर्जमाफीचा लढा आपण शेतकऱ्यांसाठी लढूच असे सांगितले. अतिवृष्टीने बाधित पाच ते सात हजार लोकसंख्येच्या गावातून होणाऱ्या भाषणातून शेती प्रश्नावर या पुढे शिवसेना नेतृत्व करेल, असा संदेश ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी पैठण तालुक्यातील नांदर या गावातून ‘ दगा बाज रे’ असे फलक लावून सरकारला अतिवृष्टीतील पॅकेज आणि कर्जमाफी यावरुन धारेवर धरायला सुरुवात केली. राजकारण करण्यासाठी आलो नाही, असे सांगत ठाकरे यांनी अतिवृष्टीच्या पॅकेजमधील तुटपूंजी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली.

हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ती योग्य आहे का, असा प्रश्न विचारत सरकारने मदत कशी कमी दिली, हे सांगितले. खरवडून गेलेली जमीन, बँकांचे हप्ते या मुद्दयांना स्पर्श करत त्यांनी बीड आणि धाराशिवमध्ये ठाकरे यांनी कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला.

अतिवृष्टीतील नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज ही थट्टाच असल्याचे सांगत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावला. कर्जमाफी केली तर बँकाचा फायदा होईल्. बँकाचा फायदा न होऊ देता कशी कर्जमाफी करणार ? कर्जमाफी जूनमध्ये होणार असेल तर बँकांचे हप्ते कसे भरणार आणि कोठून ? ’ कर्जमाफी हा विषय आम्ही सोडणार नाही.

शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवू. त्यासाठी रस्त्यावर उतरू. या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करू तेव्हा तुम्ही साद द्या, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकरी प्रश्नावर आक्रमक होत शिवसेनेतील संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

‘मतचोरी’वरुन भुमरेंच्या मतदारसंघात टोलेबाजी

२० हजार लोक बाहेरुन आणून जिंकल्याचे निर्लज्जपणे सांगतात. आता निवडून आलाच आहात आता तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. पैठण मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी एका मेळाव्यात निवडणुकीमध्ये २० हजार जणांना बाहेरून आणले असल्याचा उल्लेख केला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना डोळ्यांनी दटावले होते. ‘मतचोरी’ च्या मुद्दयाला या मुळे बळ मिळाले होते. त्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी पैठण मतदारसंघात टोलेबाजी केली.

फलकांची कुरघोडी

नांदर पंचायत समितीच्या गणात शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असणारे फलक लावण्यात आले होते. ही संख्या जास्त दिसू लागताच शिवसेना खासदार संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांनीही नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मेळाव्याचा मुहुर्त ५ नोव्हेंबरच काढला आणि या मेळाव्याचे बॅनर नांदर गाव व परिसरात अधिक ठसठशीतपणे लावले होते.