पुणे : सोलापूर येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेले विधान चुकीचे असून, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणार आहे, असे पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
आमदार जगताप यांनी सोलापूर येथे ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा,’ असे विधान केले. खडकवासला विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांच्या पाहणीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, ‘जगताप यांनी अतिशय चुकीचे विधान केले असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतरही पक्षाच्या विचारधारेपासून कोणताही खासदार-आमदार किंवा पक्षाशी संबंधित जबाबदार व्यक्ती, अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल, तर ते पक्षाला मान्य नाही.’
‘अरुणकाका जगताप हयात होते, तोपर्यंत तेथे सर्व सुरळीत होते. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागले, बोलले पाहिजे. एका कार्यक्रमात जगताप यांना अशा विधानांबाबत समज दिली होती. त्यावर सुधारणा करेन, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही सुधारणा दिसत नाही,’ असेही पवार म्हणाले.
बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी आणि कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले,‘बळीराजाबाबत असे वक्तव्य करण्याचे काही कारण नाही. त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर त्यांच्याशी बोलेन,’
महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर निवडणूक आयोगात जाण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले,‘राज ठाकरे हे स्वतंत्र विचाराचे आहेत. मात्र, त्यांनी अनेकदा त्या वेळची परिस्थितीनुसार भूमिका बदलली. कुठे जायचे आणि कुठे नाही, हा त्यांचा प्रश्न आहे.’
‘पक्षवाढीसाठी समाजात चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.’
‘स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत जिल्हास्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, ‘या निवडणुका स्थानिक प्रश्नांवर लढायला हव्यात. प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सगळेच चित्र स्पष्ट होईल.’