पुणे : शहरात तयार होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सहा मैलापाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्प अद्ययावत केले जाणार आहे. यासाठीचा आराखडा महापालिकेने तयार केला होता. त्याला केंद्र सरकारने ‘अमृत – २’ योजनेतंर्गत ८४२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.
राज्य सरकारने देखील आता या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. ८४२ कोटींपैकी २५२.८६ लाख केंद्र सरकार, २१०.७१ कोटी राज्य सरकार, तर पुणे महापालिकेला २०.४९ कोटी रुपयांच्या खर्चाचा भार उचलावा लागणार आहे.
मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून महापालिकेला मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केल्याची माहिती दिली. या प्रकल्पांसाठीची उर्वरित ३५९.७६ कोटी रुपयांची रक्कम खासगी भागीदारीतून (पीपीपी ) तत्त्वावर उभारली जाणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या कार्यादेशानंतर पुढील दोन ते तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या हद्दीत तयार होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. यापैकी नायडू रुग्णालय येथील प्रकल्प महापालिकेने पाडला असून, सध्या ९ प्रकल्पांद्वारे नदीत येणारे मैलापाणी शुद्ध केले जात आहे.
या प्रकल्पांची क्षमता कमी झाली असून, प्रक्रिया केलेल्या मैलापाण्यातील ‘सीओडी’ आणि ‘बीओडी’चे प्रमाण निकषांपेक्षा अधिक असल्याचे वारंवार समोर आले आहे. या प्रकल्पांमधील तंत्रज्ञान बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार त्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश सुमारे दोन वर्षांपूर्वी देण्यात आले होते.
यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त करून नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील विठ्ठलवाडी, एरंडवणे, बोपोडी आणि नायडू (नवीन), भैरोबानाला, तानाजीवाडी या केंद्रासाठीचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्यता दिली. हा ८४२.८५ कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्र सरकारकडे ‘अमृत-२’ या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या शिखर समितीने ‘हॅम मॉडेल’ अंतर्गत या प्रकल्पाचा समावेश करून या प्रकल्पाला मे महिन्यात मान्यता दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सोमवारी आदेश काढून प्रशासकीय मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमावरून जाहीर केले. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची एकत्रित क्षमता ८९ दशलक्ष लिटर वाढून ५६६ दशलक्ष लिटर प्रतिदिन होणार आहे.
‘सध्या केवळ ५५० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया’
‘शहरात दररोज ९९० एमएलडी मैलापाणी तयार होते. त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर सध्या प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. तर उर्वरित ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सुरू आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी किमान एक वर्षे लागणार आहे,’ असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेचे भैरोबानाला आणि तानाजीवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पाडून नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण केले जाईल. त्यासाठीच्या निविदा आल्या आहेत. – पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.