बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवडीला कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. ‘ब’ वर्ग गटातील व्यक्तीला अध्यक्ष होता येत नसल्याचा न्यायालयाचा निर्णय असल्याने अजित पवार यांची निवड बेकायदा असल्याचा दावा तावरे केला आहे.

निवडणुकीच्या प्रचारामध्येच अजित पवार यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी स्वत:च्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकल्या. शनिवारी कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचा एकच अर्ज होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पवार यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्या निवडीवर आक्षेप घेतला.

‘ब’ वर्ग गटातील व्यक्तीला अध्यक्ष होता येत नाही, असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. असे तावरे यांनी सांगितले. त्यानंतर तावरे हे बैठकीतून निघून गेले.

अजित पवारांनी अध्यक्षपद का घेतले?

या कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अनेकजण इच्छुक होते. इच्छुकांपैकी काही जणांविरूद्ध सभासदांची नाराजी होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी स्वतःचेच नाव जाहीर केले. निवडणूक निकालानंतर विजयी मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी आपणच पाच वर्षे अध्यक्षपदी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इच्छुकांची आशा मावळली आहे.

पवार कुटुंबातील पहिलीच व्यक्ती

साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारलेली पवार कुटुंबातील अजित पवार ही पहिलीच व्यक्ती ठरली आहे. उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी हे पद घेतले आहे. बारामतीवरील पकड आणखी मजबूत करण्यासाठी पवार यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उपाध्यक्षपदी संगिता कोकरे

कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संगिता कोकरे यांची निवड संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.