पुणे : विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी अकरापासून दुपारी दोनपर्यंत तापमानात वाढ होऊन दुपारनंतर काही ठिकाणी विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत पुढील तीन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. उष्णतेत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शक्यता कुठे?

सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचाही अंदाज आहे.

मोसमी वारे रविवारी केरळमध्ये

बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या मोसमी वाऱ्यांची आता आगेकूच सुरू झाली आहे.
मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरुवारी प्रवेश केला. त्याचबरोबरच मालदीव, कोमोरीन दक्षिण मध्यपूर्व बंगालच्या उपसागरत्ही ते पोहोचले आहेत.

हे वारे पुढे सरकण्यास सध्या अनुकूल स्थिती आहे. त्यानुसार वाऱ्यांचा वेग आणि अनुकूल स्थिती योग्य राहिल्यास रविवारी (४ जून) मोसमी वारे केरळात दाखल होण्याची चिन्हे आहेत, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department forecast of temperature increase in vidarbha west maharashtra amy