पुणे : ‘सध्या कधीही पाऊस पडतो आहे. ऋतुचक्र असे काही राहिले नाही. माणसाने निसर्गाची हाक ऐकली नाही, तर येणारे भविष्य धोकादायकच असेल. मात्र, अजूनही वेळ गेली नाही, प्रत्येकाने एक तरी झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घ्यायला हवा…’ हे उद्गार आहेत जुन्नर येथील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांचे. जलसंवर्धन आणि वृक्षारोपणाचा ध्यास घेतलेले खरमाळे यांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये त्यांच्या कामाचा उल्लेख केला.
‘दर रविवारी सगळेच आराम करतात. मात्र, खरमाळे आणि त्यांचे कुटुंब कुदळ, फावडे घेऊन बाहेर पडते. ऊन असो की, उंच डोंगर, त्यांची पावले थांबत नाहीत. ते जुन्नरच्या सह्याद्रीच्या डोंगरात पाणी अडविण्यासाठी चर खणतात. खड्डे खोदून झाडे लावतात. आतापर्यंत त्यांनी शेकडो रोपे लावली आहेत, त्यांना जगवले आहे.
दोन महिन्यांत तब्बल ७० चर खणून पाणी अडविण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. त्यांनी अनेक छोटे मोठे तलाव बांधले आहेत. आता त्यांनी ‘ऑक्सिजन पार्क’चे काम हाती घेतल्याचे समजते. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक पक्षी त्या परिसरात परतू लागले आहेत…’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी खरामळे यांच्या कार्याचा गौरव केला.
‘निसर्गाकडून आपण काही ना काही घेतच आलो आहोत. मात्र, निसर्गाला देण्यासाठी माणसाकडे काहीच नसते. आपण निसर्गाचे देणे लागतो, या भावनेतून जलसंवर्धन आणि वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. जुन्नरजवळच्या धामणखेल डोंगरावर पाणी मुरविण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. पत्नीच्या मदतीने दोन महिन्यांत ४१२ मीटर लांबीचे ७० जलशोषक चर खोदले.
पावसाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी वाहून जात होते. आता मात्र खोदलेल्या ‘चरां’मधून जमिनीत लाखो लिटर पाणी मुरायला लागले आहे. दोन माणसे मिळून ७० चर खोदू शकतात, तर एक गाव मिळून हजारो लोकांची तहान भागवू शकते,’ असे खरमाळे सांगतात. त्याच डोंगरावर सुमारे ४५० झाडे लावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रमेश खरमाळे यांचे काम पाहून, ऐकून आणि समजून प्रत्येकालाच प्रेरणा मिळेल. त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे अनेक पक्षी परतू लागले आहेत, वन्यजीव जिवंत होत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
वाढते प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे माणसाबरोबरच मुक्या जीवांनाही श्वास घेणे अवघड झाले आहे. संपूर्ण जैवसाखळीला मोकळा श्वास देण्यासाठी ‘ऑक्सिजन पार्क’चे काम हाती घेतले आहे. आता पंतप्रधानांनीच दखल घेतल्याने नवी ऊर्जा मिळाली आहे. – रमेश खरमाळे, पर्यावरणप्रेमी.