जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेवर गेली पाच वर्षे माजी आमदार संजय जगताप यांच्या काँग्रेसची सत्ता होती. तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जेजुरी नगरपरिषदेमधील काही नगरसेवक त्यांच्याबरोबर भाजपमध्ये आले आहेत. यामुळे आता नगरपरिषदेमधील राजकीय समीकरणे बदलतील का, याची चर्चा सुरू आहे.

मागील निवडणुकीत नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्यासह ११ नगरसेवक काँग्रेसचे, तर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक निवडून आले होते. भाजप आणि तत्कालीन शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता.

काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी गेली ३० वर्षे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांची सत्ता होती. ती सत्ता काँग्रेसने खेचून घेतली होती. मात्र, आता जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी आमदार अशोक टेकवडे आणि भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांनीही जेजुरी निवडणुकीत लक्ष घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ), शिवसेना (शिंदे), काँग्रेस आणि काही अपक्षांमध्ये निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजप विरोधात अन्य पक्षांची आघाडी करण्यासाठी खलबते सुरू झाली आहेत.

सद्यस्थितीत नगरपरिषदेवर माजी आमदार संजय जगताप आणि माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई या नेत्यांचे प्रभुत्व आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे माजी नगरसेवक सुधीर गोडसे, शहराध्यक्ष सचिन पेशवे, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई यांचे पुत्र नगरसेवक जयदीप बारभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) यांच्या पक्षातर्फे माजी नगरसेवक गणेश निकुडे, शिवसेना (शिंदे) विठ्ठल सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर, संतोष खोमणे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संदीप जगताप आदी नावे चर्चेत आहेत.

जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने या जागेवर कोणालाही उभे राहता येणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

  • प्रभाग संख्या – १०
  • सदस्य संख्या – २०
  • एकूण मतदार संख्या – १५८००