पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच पक्षाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थ खात्याकडून निधी न मिळाल्याने ‘आनंदाचा शिधा’ बंद झाल्याची कबुली दिली असल्याने राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे.’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्य सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रूपये आहेत. मात्र, ‘आनंदाचा शिधा’, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी का नाही,’ असा सवालही त्यांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघातील महावितरण आणि महापारेषणच्या वीज यंत्रणेच्या आढावा बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘राज्य सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रूपये आहेत. मात्र, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले? लाडक्या बहिणींना पैसे का दिले जात नाहीत ? ‘आनंदाचा शिधा’ कोठे गेला? छगन भुजबळ यांनी अर्थ खात्याकडून निधी न मिळाल्याने आनंदाचा शिधा बंद झाल्याची कबुली दिली आहे. त्यावरून राज्याचे आर्थिक नियोजन कोळमडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.’
‘ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे २५ लाडक्या बहिणींची नावे योजनेतून वगळण्यात आली. त्यांची संख्या रोज वाढत आहे. गोरगरिबांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ बंद करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी संशोधन करणारे विद्यार्थी आंदोलन करतात. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. सरकारला त्याचाही विसर पडलेला दिसतो,’ असे सुळे म्हणाल्या.
कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेबाबत खासदार सुळे म्हणाल्या,‘विठ्ठलाची पूजा कोणी करायची, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, सरकारला तातडीने सरसकट कर्जमाफी करण्याची बुद्धी द्यावी, हेच आमचे विठ्ठलाकडे साकडे आहे.’
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी अहवाल पाठवला नसल्याचे जाहीर सभेत सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी केंद्राकडे मदत मागितली का, हा प्रश्नच आहे. राज्य सरकारने हा अहवाल का पाठवला नाही, हे जाहीर करावे,’ अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्या म्हणाल्या,‘स्थानिक मुद्द्यांवरून त्या निवडणुका लढवल्या जातात. त्या एकत्र लढवायच्या की नाही, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील. निवडणुका कधी होणार हे माहिती नाही. मात्र, आगामी महिनाभरात त्यात अधिक स्पष्टता येईल.’
‘अदृश्य शक्तीच्या दबावामुळे पुण्यात गुन्हेगारी’
‘पुण्यासारख्या शहरात विधी महाविद्यालय रस्त्यावर पोलिसांवर हल्ला केला जातो. पोलीसच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांनी न्याय कोठे मागायचा? शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले नाकारले जातात. मात्र, गुन्हेगाराला तत्काळ पारपत्र कसे काय मिळते? पोलिसांवर आमचा विश्वास आहे. मात्र, अदृश्य शक्तीच्या दबावामुळे पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल खासदार सुळे यांनी केला.
‘महावितरणची परिस्थिती चिंताजनक’
‘महावितरणची परिस्थिती चिंताजनक आहे. मागणीपेक्षा उर्जेची निर्मिती अधिक असल्याचे सरकार सांगते. मात्र, पुणे जिल्ह्यात विजेचे प्रश्न मांडावे लागतात. कोथरूड, भोर-वेल्हा-मुळशी-पिरंगुट, खडकवासला अशा औद्योगिक भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा परिणाम राज्यातील उद्योगधंद्यांवर होत आहे. सरकारला राज्यात मोठी गुंतवणूक आणायची आहे; पण मुलभूत प्रश्नच अनुत्तरीत आहेत,’ अशी टीका खासदार सुळे यांनी केली.