Tanaji Sawant Son Rushiraj Sawant: शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत सोमवारी (१० फेब्रुवारी) पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांना ही माहिती समजताच पुणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आणि त्यानंतर रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान ऋषीराज सावंत सुखरुप पुणे विमानतळावर दाखल झाला. मात्र, ऋषीराज सावंत एका खासगी विमानाने बँकॉकला जात होता अशी माहिती समोर आली. पण कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात चालल्यामुळे कुटुंबीय धास्तावले होते. दरम्यान, नेमकं काय घडलं होतं? कुटुंबीयांना माहिती न देता ऋषीराज सावंत बँकॉकला कशासाठी चालला होता? यासंदर्भातील सविस्तर माहिती आता ऋषीराज सावंत यांचे बंधू गिरीराज सावंत यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीराज सावंत काय म्हणाले?

“काल साधारण दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास मला ऋषीराज सावंत यांचा व्हॉट्सअ‍ॅपला मेसेज आला. मेसेजमध्ये दोन दिवस तो कुठेतरी चाललो आहे असं सांगितलं आणि त्यानंतर फोन बंद केला. त्यानंतर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमकं कुठे गेला? बरोबर कोण आहे? याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आम्ही सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आमच्या कुटुंबातील कोण कुठे चाललंय? याबाबत आमच्यात नेहमी संभाषण होत असतं. तसेच न सांगता आमच्या कुटुंबातील कोण कुठेही कधीच जात नाही. हे असं झाल्यामुळे आम्हाला चिंता लागली आणि आम्ही तक्रार दाखल केली”, असं गिरीराज सावंत यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.

“याआधीच ८ दिवस तो दुबईला गेला होता, त्या ठिकाणी व्यवसायासंदर्भात काहीतरी प्रदर्शन होतं. दुबईला ८ दिवस राहून आल्यानंतर लगेच व्यवसायाच्या कामासंदर्भानेच बँकॉकला जायचं होतं. पण दुबईत ८ दिवस राहून आल्यानंतर लगेच घरचे बँकॉकला सोडणार नाहीत. त्यामुळे भितीपोटी कोणालाही न सांगता आणि कोणाशीही संवाद न साधता फक्त एक मेसेज टाकला आणि तो गायब झाला. पण कुटुंब म्हणून आम्ही घाबरलो. कारण याआधी असं काही घडलं नव्हतं. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दिली आणि पुढील प्रक्रिया घडली”, असंही गिरीराज सावंत यांनी सांगितलं.

“ऋषीराज सावंतबरोबर त्याचे दोन मित्रही होते. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्याच्याबरोबर कोण गेलं? त्यामुळे आम्ही अपहरणाची तक्रार दाखल केली. तसेच बँकॉकला कदाचित तो व्यवसायाच्या संदर्भानेच चालला होता. पोलीस प्रशासनामुळे आम्हाला फार मदत झाली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने ते विमान ट्रेस झालं आणि तो एका खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, त्यानंतर रात्री ९:३० च्या सुमारास तो पुण्यात दाखल झाला”, असं गिरीराज सावंत यांनी सांगितलं. “पण काही विरोधकांच्या माध्यमातून गैरसमज परवण्याचा प्रकार होत आहे. मात्र, कौटुंबिक वाद असं काहीही नाही. तो वैयक्तिक कारणाने गेला होता. फक्त वडील जाऊन देणार नाहीत त्यामुळे त्याने हे सर्व केलं. वडिलांच्या भितीपोटी त्याने आम्हाला सांगितलं नाही”, असं गिरीराज सावंत यांनी म्हटलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanaji sawant son rushiraj sawant missing in great information told by giriraj sawant gkt