पुणे : ‘मणिपूरमधील एका मुलीने माझा सन्मान केला. त्याने मी निःशब्द झालो आणि मला गहिवरून आले. सध्या मणिपूर पेटलेले आहे. लेह-लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. गावागावांत जवान तैनात केलेले आहेत. आसाममध्येही परिस्थिती पेटलेली आहे. काश्मीरमध्येही अशांतता आहे, हे सगळे चित्र चांगले नाही. ७५ वर्षे झाली. आता हेच का स्वातंत्र्य, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफल रंगवायची कशी?’, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उपस्थित केला.
सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मार्मिकच्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे.
राऊत म्हणाले, ‘उत्तम संगीतकार, संगीत संयोजक, व्यंगचित्रकार, वक्ते, संपादक, लेखक आणि व्हायोलिनवादक असलेले श्रीकांत ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. बाळासाहेब आणि त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी होती. संगीतक्षेत्राला त्या काळात ५० वर्षे पुढे नेण्याचे काम श्रीकांत ठाकरे यांनी केले. आता नावारूपाला आलेल्या गायकांपैकी काहींना पहिल्यांदा गाण्याची संधी श्रीकांत ठाकरे यांनीच दिली होती. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले. डाॅ. अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
मराठी गीत उर्दूमध्ये लिहिणारे श्रीकांतजी
‘‘शोधीसी मानवा राऊळी मंदिरी’ हे गीत श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्यासाठी स्वरबद्ध केले होते. विशेष म्हणजे श्रीकांत ठाकरे यांना उत्तम उर्दू येत असे. त्यामुळे या गीतातील शब्द न शब्द कळावेत म्हणून श्रीकांत काका यांनी हे मराठी गाणे महंमद रफी यांना उर्दूत लिहून दिले होते,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंबप्रमुख असलेल्या श्रीकांत काकांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे, असेही त्यांनी सांगितले.