‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवलोकातून अवतरलेले महापुरुष आहेत. ईश्वरी व्यवस्थेतून जे लोक येतात ते अशक्यप्राय गोष्टही शक्य करू शकतात. मोदी हे त्यातील एक आहेत. जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० वे कलम हटवणे, अयोध्येत राममंदिराची उभारणी, एका दूरध्वनीवरून रशिया-युक्रेन युद्ध थांबवून तेथे अडकलेल्या भारतीयांची सुरक्षित सुटका करणे असे प्रराक्रम केवळ मोदीच करू शकतात’.
‘रशियाच्या तेल आयातीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला तरी भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी छातीचा कोट करून उभे राहण्याची हिंमत केवळ मोदीच दाखवू शकतात’ अशी विधाने भाजपच्या कुणा स्थानिक प्रवक्त्यांनी केली असती तरी एक वेळ समजू शकले असते.
पण ही विधाने केली आहेत ती राज्याचे घटनात्मक प्रमुखपदी असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी; तीही मोदी यांच्यावरील एका चरित्रपुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजभवनातच, स्वत:च्या हस्ते घडवून आणताना.
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात या गृह राज्याचे गेली सहा वर्षे राज्यपालपद भूषविणाऱ्या आचार्य देवव्रत यांना बहुधा महाराष्ट्राचे पूर्णवेळ राज्यपाल होण्याचे वेध लागले असावेत. यातूनच कदाचित घटनात्मक पदावर असतानाही नेतेमंडळींची भलामण करण्याची लाचारी त्यांनी सुरू केली असावी.
आधीचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यपालपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून गेला दीड महिना देवव्रत हे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. खरे तर राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यासाठी पूर्णवेळ राज्यपालांची नियुक्ती करणे आवश्यक होते. ही नियुक्ती लांबते आहे, तोवर तेव्हा देवव्रत यांनी सुस्तिसुमने उधळल्याने मलबार हिलवरील ब्रिटिशकालीन सुंदर अशा राजभवनाच्या वास्तूत त्यांचा मुक्काम वाढूही शकतो.
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात, ऑगस्ट २०१५ सर्वाधिक १० वर्षांपेक्षा अधिक काळ राज्यपालपद भूषवण्याचा देवव्रत यांचा विक्रमच. वास्तविक २२ जुलै २०१९ रोजी गुजरातचे राज्यपाल म्हणून नेमले गेलेले देवव्रत यांचा पाच वर्षांचा पदावधी संपुष्टात आला आहे. पण ‘उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात’ या राज्यघटनेतील तरतुदीनुसार ते भाजपमधील उच्चपदस्थांचा आशीर्वाद असेपर्यंत हे पद भूषवू शकतात.
मूळचे हरियाणातील असलेसे देवव्रत हे आर्य समाजाच्या विचारांचे पाठीराखे आहेत. कुरुक्षेत्रमधील गुरुकुलाच्या मुख्याध्यापकपदी त्यांची १९८०च्या दशकात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना आचार्य ही पदवी बहाल करण्यात आली होती. शैक्षणिक आणि नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रांमध्ये काम असणारे देवव्रत यांनी राष्ट्रीय पातळीवर काही भरीव कामगिरी केल्याची काही उदाहरणेही नाहीत.
याआधीही ‘मोदी ही भारताला मिळालेली दैवी देणगी आहे’, असे विधान संसदीय कामकाज मंत्री पदावर असताना व्यंकय्या नायडू यांनी केले होते. थोड्याच दिवसांत नायडू यांना मोदींनी उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली गेली. अर्थात नायडू यांचे राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पूर्ण झाले नाही हे वेगळे.
मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोदींना दैवी शक्तीची उपमा दिली होती; पण चौहान यांचे मुख्यमंत्रीपद गेले व आता केंद्रात कृषी मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. मुंबईत भाजपचे राज पुरोहित यांनी मोदी हे विष्णूचा अवतार असल्याची स्तुतिसुमने उधळली होती. ही भाटगिरीची परंपरा काँग्रेस सरकारच्या काळातली.
‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असे अकलेचे तारे तोडून काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी वाद ओढवून घेतला होता. आणीबाणीच्या काळात बारुआ काँग्रेसचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधी यांची एवढी लाचारी करूनही बारुआ यांचे नंतर काही भले झाले नाही. पदांसाठी लाचारी करणाऱ्यांची फौज भाजपमध्येही कमी नाही.
परंतु राज्यपालपदासारख्या घटनात्मक पदावर असताना काय बोलायचे याचे भान देवव्रत यांच्यासारख्यांनी बाळगायला हवे होते. नेतृत्वाची चमचेगिरी केल्याशिवाय हल्ली काही खरे नसते. मोदींची स्तुती करण्यात आपणही कमी पडायला नको हे ओळखूनच कायम मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याच कार्यक्रमात मोदींच्या कार्याचे धडे शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हवेत अशी भूमिका मांडली.
बारुआ, व्यंकय्या नायडू, शिवराजसिंह चौहान, आचार्य देवव्रत अशी किती लाचारांची फौज? स्वत: मोदीच म्हणाले होते की, त्यांना ‘ईश्वराने सेवेसाठी पाठवले आहे. ही ऊर्जा जैविकदृष्ट्या जन्मातून मिळत नाही’. आता मोदीच असे बोलतात म्हटल्यावर इतरांना तरी दोष कसा देणार?
