ठाणे : पक्षाचे लोक सोडून जात असताना नेता आनंद व्यक्त करत आहे. ज्याला पक्षातून जायचे त्यांनी खुशाल जावे असे ते म्हणत आहेत, हे आपण कधी पाहिले नसेल. रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवित होता अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आत्मचिंतन करण्याऐवजी फक्त आरोप-शिव्याशाप या शिवाय त्यांच्या अजेंड्यामध्ये काही नाही असा आरोपही त्यांनी ठाकरे यांच्यावर केला.
साधन फाऊंडेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रविवारी महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी निवडणूक आयोग धोंडा नव्हता. तेव्हा ते धोंडा म्हणाले नव्हते. जेव्हा अपयश मिळते, त्यावेळेस ते दोष देण्याचे काम करतात असेही शिंदे म्हणाले.
जनता ही सर्वस्वी आहे. जे जनतेचे काम करतात. त्यांना जनता मदत करते. जे कामे करत नाहीत. त्यांना जनता घरी बसविते असा आरोपही त्यांनी केला. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडविला. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही केल्या आणि तिथेच सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. अनेकांनी सत्तेचे इमले बांधले होते. पंचतारांकित हाॅटेलमध्ये नोंदणी केली होती. मंत्री मंडळाचे वाटप करुन घेतली होती. पण आमच्या लाडक्या बहिणींनी हाॅटेलमधील ती नोंदणी रद्द केली आणि पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले असे शिंदे म्हणाले.
सत्ता येते-जाते. पद वर खाली होत राहतात. मी अडीच वर्षांत सर्वसामान्य जनतेसाठी विविध कामे केली. त्याचा मला आनंद आहे. सर्व पदापेक्षा लाडका भाऊ ही नवी ओळख मोठी आहे असेही शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी, सत्तेसाठी कधीही आम्ही तडजोड, मोह केला नाही असेही ते म्हणाले.