Thane municipal election :ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (उबाठा) आणि मनसेने काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष सामील झाले होते. पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात काढलेल्या मोर्च्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते एकटवल्याचे चित्र दिसून आले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्याच्या श्री तुळजाभवानी मंदीरात दिपोत्सव करून एकत्रित दिवाळी फराळ करणार आहेत. यानिमित्ताने मविआचे नेते पुन्हा एकीचे दर्शन घडविणार आहेत.
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय संपादन करत तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्याच्या नगरविकास विभागांर्तगत पालिकेचा कारभार सुरू असून नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालिकेच्या कारभारावर बोट ठेवत थेट शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (उबाठा) आणि मनसेने काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष सामील झाले होते. पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात काढलेल्या मोर्च्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते एकटवल्याचे चित्र दिसून आले. पुर्वी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे पक्ष महाविकास आघाडीत होते. परंतु आता मनसेही महाविकास आघाडीत सामील झाल्याचे दिसून येत आहे. पालिकेविरोधातील मोर्चानंतर आता ठाण्याच्या श्री तुळजाभवानी मंदीरात मविआचे नेते दिपोत्सव करून पुन्हा एकीचे दर्शन घडविणार आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने येत्या सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी पाचपाखाडी येथील गणेशवाडी भागातील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता या दीपोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मविआचे सर्व कार्यकर्ते एकत्रित दिवाळी फराळ करणार आहेत, अशी माहिती मनोज प्रधान यांनी दिली. ठाणेकर नागरिकांनीही या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिरात उपस्थित रहावे, असे आवाहन मनोज प्रधान, केदार दिघे, विक्रांत चव्हाण आणि रवींद्र मोरे, यांनी केले आहे.